India vs England, 3rd Test Match at Rajkot:
भारत आणि इंग्लंड संघात सध्या 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना राजकोटला 15 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी एक दिवस आधीच इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे.
इंग्लंडने राजकोटला होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. इंग्लंडने फिरकीपटू शोएब बशीरला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केले आहे. बशीरने विशाखापट्टणमला झालेल्या दुसऱ्या कसोटीतून पदार्पण केले होते. मात्र त्यानंतर आता तिसऱ्या सामन्यातून त्याला वगळले आहे.
बशीरच्या जागेवर वेगवान गोलंदाज मार्क वूडला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता इंग्लंडकडे वेगवान गोलंदाजीसाठी वूड आणि जेम्स अँडरसन हे दोन पर्याय असतील. वूडला दुसऱ्या कसोटीत खेळवले नव्हते. पण तो पहिल्या कसोटीत खेळला होता.
दरम्यान, बशीर संघातून बाहेर झाल्याने आता इंग्लंड संघाकडून फिरकी गोलंदाजीची जबाबदारी रेहान अहमद आणि टॉम हर्टली या दोघांवर अधिक असणार आहे. त्यांना जो रुटची साथ मिळू शकते. दरम्यान, या कसोटी मालिकेतून इंग्लंडचा प्रमुख फिरकीपटू जॅक लीच गुडघ्याच्या दुखापतीमुळे बाहेर गेला आहे.
दरम्यान, मार्क वूडच्या समावेशाव्यतिरिक्त कोणताही बदल इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनमध्ये केलेला नाही. त्यामुळे बशीर व्यतिरिक्त विशाखापट्टणम कसोटीत इंग्लंडकडून खेळलेले सर्व 10 खेळाडू राजकोट कसोटीतही खेळणार आहेत.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा हा कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना असणार आहे. तो मैदानात उतरताच 100 कसोटी सामने खेळणारा इंग्लंडचा 16 वा खेळाडू ठरेल. स्टोक्सने आत्तापर्यंत खेळलेल्या 99 कसोटीत 6251 धावा केल्या आहेत. तसेच 197 विकेट्स घेतल्या आहेत.
तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन -
झॅक क्रावली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), रेहान अहमद, टॉम हर्टली, मार्क वूड, जेम्स अँडरसन.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.