India vs England, 3rd Test at Rajkot:
भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पहिल्या डावात 126 धावांची आघाडी मिळाली आहे. गुरुवारपासून (15 फेब्रुवारी) सुरू झालेल्या या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात इंग्लंडचा पहिला डाव 71.1 षटकात 319 धावांत संपुष्टात आला आहे.
या सामन्यात तिसऱ्या दिवशी इंग्लंडने 36 व्या षटकापासून आणि 2 बाद 207 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. यावेळी शतकी खेळी करणारा बेन डकेट आणि जो रुट नाबाद खेळत होते. त्यांनी सुरुवात समाधानकारक केली होती.
पण जसप्रीत बुमराहने भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्याने 40 व्या षटकात इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रुटचा अडथळा दूर केला. रुटचा 18 धावांवर असताना शानदार झेल जयस्वालने पकडला.
त्याच्या पुढच्याच षटकात बेअरस्टोविरुद्ध कुलदीप यादवने टाकलेला चेंडूने मोठे वळण घेतले. ज्याचा अंदाज बेअरस्टोला आला नाही आणि तो पायचीत झाला. तरी त्याने रिव्ह्यू घेतला होता, पण त्यातही तो स्पष्ट बाद असल्याचे दिसले.
यानंतर शतकवीर डकेटने कर्णधार बेन स्टोक्सला साथीला घेत डाव पुढे नेला होता. त्याने दीडशतक पूर्ण केले. मात्र, 51 व्या षटकात कुलदीपनेच डकेटला चकवलं. डकेटचा शॉट मारताना नियंत्रण गेले आणि तो शुभमन गिलकडे सोपा झेल देत बाद झाला. त्याने 151 चेंडूत 23 चौकार आणि 2 षटकारांसह 153 धावा केल्या.
तो बाद झाल्यानंतर स्टोक्स आणि बेन फोक्सने पहिले सत्र संपेपर्यंत आणखी यश भारताला मिळू दिले नव्हते. परंतु, दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच स्टोक्सला 65 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रविंद्र जडेजाने 41 धावांवर माघारी पाठवले.
त्याच्या पुढच्याच चेंडूवर मोहम्मद सिराजने बेन फोक्सला 13 धावांवर बाद केले. त्यामुळे चांगली सुरुवात मिळालेला इंग्लंड संघ संकटात सापडला.
इंग्लंडच्या तळातल्या फलंदाजांनाही फार योगदान देता आले नाही. सिराज आणि जडेजाने इंग्लंडचे शेपूट झटपट गुंडाळले. जडेजाने टॉम हर्टलीला 9 धावांवर बाद केले, तर सिराजने रेहान अहमद (6) आणि जेम्स अँडरसनला (1) बाद केले. त्यामुळे इंग्लंडचा संघ ३१९ धावांवरच सर्वबाद झाला.
दरम्यान, इंग्लंडकडून पहिल्या दिवशी झॅक क्रावली 15 धावांवर आणि ऑली पोप 39 धावांवर बाद झाला होता.
भारताकडून पहिल्या डावात मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 130.5 षटकात सर्वबाद 445 धावा केल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.