R Ashwin withdrawn from India vs England 3rd Test:
भारत विरुद्ध इंग्लंड संघात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून (15 फेब्रुवारी) राजकोटला सुरू झाला आहे. मात्र या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर मोठी बातमी समोर आली आहे. भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने या उर्वरित सामन्यातून तातडीने माघार घेतली आहे.
बीसीसीआयने याबद्दल शुक्रवारी रात्री (16 फेब्रुवारी) माहिती दिली आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार कौटुंबात मेडिकल एमर्जन्सी आल्याने अश्विनला चालू सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे तो घरी परतणार असून उर्वरित तिसरा सामना खेळणार आहे.
याशिवाय बीसीसीआयकडून आणि भारतीय संघाकडून त्याला या कठीण काळात पूर्ण पाठिंबा मिळेल, असेही बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.
बीसीसीआयने म्हटले की 'बीसीसीआय चॅम्पियन गोलंदाज आणि त्याच्या कुटुंबाला मनापासून पाठिंबा देत आहे. खेळाडूचे आणि त्याच्या जवळच्या लोकांचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. या कठीण काळात खेळाडूच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या खाजगी आयुष्याचा आदर राखला जावा अशी विनंती बोर्डाकडून करत आहोत.'
'बोर्डाकडून अश्विनला आवश्यक असलेली सर्व मदत मिळेल आणि त्याच्याशी गरज लागेल तो पाठिंबा देण्यासाठी सातत्याने संपर्कात राहू. हा संवेदनशील काळ चाहते आणि मीडिया समजून घेईल, अशी अपेक्षा भारतीय संघाला आहे.'
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की अश्विनने चालू असलेल्या कसोटीदरम्यानच शुक्रवारी त्याच्या कारकिर्दीत 500 कसोटी विकेट्सचा टप्पा पार केला होता. तो 500 कसोटी विकेट्स घेणारा जगातील नववा गोलंदाज आहे, तर भारताचा अनिल कुंबळेनंतरचा (619 विकेट्स) दुसराच गोलंदाज आहे.
त्याचबरोबर अश्विन सर्वात जलद 500 विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजही आहे. त्याने 98 व्या सामन्यात खेळतानाच 500 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्याआधी केवळ मुथय्या मुरलीधरन आहे. मुथय्या मुरलीधरनने 87 कसोटीत 500 विकेट्स घेतल्या होत्या.
दरम्यान, राजकोट कसोटीत दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने पहिल्या डावात 35 षटकात 2 बाद 207 धावा केल्या आहेत. ते अद्याप 238 धावांनी पिछाडीवर आहेत. या सामन्यात पहिल्या डावात भारताने सर्वबाद 445 धावा केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.