Ind Vs Pak: भारत-पाक सामन्याला काही तास बाकी असताना मोठी बातमी बाहेर! 'पीच'मध्ये केला बदल; कुणाला होणार फायदा?
कोलंबो: अनिश्चिततेचे ढग निर्माण झालेली टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील बहुचर्चित भारत-पाक लढत उद्या (ता. १५) होत आहे. कमालीची उत्सुकता वाढलेली असताना लढतीवर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. त्याच वेळी सामना सुरू झाल्यावर पाऊस नसेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भारत-पाकिस्तान सामन्याला एक वेगळी धार असते.
गेल्या काही वर्षांत पाकिस्तान संघातील खरी ताकद जरा कमी झाली, ज्याचा परिणाम भारत- पाकिस्तान लढतींवर झाला. खास करून भारतीय संघाने आयसीसी स्पर्धांमध्ये पाकिस्तानला बऱ्याच वेळा हरवल्याचे दिसते. तरीही टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारत वि. पाकिस्तान लढतीची उत्सुकता खूप कमी झालेली दिसत नाही. याला कारण आहे, दोनही देशांमधील वेळोवेळी ताणली गेलेली राजकीय परिस्थिती आणि तरीही क्रिकेट चाहत्यांच्या गुंतलेल्या भावना.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात एददिवसीय आणि टी-२० या दोन्ही विश्वकरंडक स्पर्धेत मिळून १६ सामने झाले आहेत. यात भारताने १५ लढती जिंकलेल्या असून पाकला केवळ एकच सामना जिंकता आलेला आहे. हा इतिहास पाहता भारताचे पारडे निश्चितच जड आहे; परंतु उद्याचा सामना होणाऱ्या कोलंबोतील परिस्थिती काहीशी वेगळी आहे. त्याच मुळे पाक संघ विजयाची आशा बाळगून आहे.
प्रेमदासा स्टेडियमची खेळपट्टी फिरकीस साथ देणारी आहे आणि त्यांच्याकडे पाच फिरकी गोलंदाज आहेत. शिवाय, तिरकस शैली असणारा आणि थांबून चेंडू टाकणारा उस्मान तारिक हे नवे अस्त्र त्यांनी आणले आहे.
पाकिस्तानचा संघ येथे या विश्वकरंडक स्पर्धेतील दोन सामने खेळलेला आहे. उद्याच्या सामन्यासाठी त्यांना दोन दिवसांपासून सराव केलेला आहे तर भारताला केवळ एकच सत्र सरावाची संधी मिळाली आहे.
असे असले तरी रविवारच्या लढतीअगोदर कागदावर तरी भारताचा संघच वरचढ दिसतो आहे. भारतीय संघाच्या फलंदाजीत असलेली आक्रमकता फार मोठा घटक आहे. त्यातून अभिषेक शर्मा पोटाच्या विकारातून बरा होऊन रविवारचा सामना खेळायच्या तयारीत आहे.
गेल्या कित्येक टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजांनी पॉवर प्लेच्या पहिल्या सहा षटकांत गोलंदाजांवर आक्रमण करायचा मार्ग अवलंबला आहे. वरकरणी काही माजी पाकिस्तानी खेळाडू अभिषेक शर्माच्या तंत्रावरून टीका करताना बघायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला अभिषेक शर्माचे भय पाकिस्तानी खेळाडू पत्रकार आणि माजी खेळाडूंमध्ये पसरल्याची जाणवत आहे.
रविवारच्या सामन्यासाठी भारतीय संघात संजू सॅमसनच्या जागी अभिषेक शर्मा इतका एकच बदल होण्याची शक्यता दाट वाटते. तीन वेगवान गोलंदाज दोन फिरकी गोलंदाज आणि दुबेच्या मध्यमगती माऱ्याचा एक अतिरिक्त पर्याय याच समीकरणाने भारतीय संघ प्रेमदासा मैदानावर पाऊल ठेवेल, असे वाटते. प्रेमदासा मैदानाची खेळपट्टी
भरपूर पाणी आणि भरपूर रोलिंग करून तयार केली गेली आहे. मैदानाच्या सीमारेषा बाकी मैदानांच्या तुलनेत चांगल्या लांब आहेत आणि मूळचा खेळपट्टीचा स्वभाव किंचित हळू असल्याचा फरक गोलंदाजी करताना पडणार आहे.
नाणेफेक जिंकण्या-हरण्याचा फार मोठा फरक पडेल, असे वाटत नाही. पावसाने सामन्यातील वेळ कमी झाली आणि पर्यायाने पंचांना सामन्यातील षटके कमी करावी लागली तर त्याचा वेगळा परिणाम दोनही संघांना योजना आखताना करावा लागणार आहे.
पाकिस्तान संघाची भिस्त अष्टपैलू खेळाडूंवर जास्त आहे. सईम आयुब, शादाब खानवर चार षटके टाकण्याबरोबर फलंदाजी करायची जबाबदारी आहे. सलामीवीर साहीबजादा फरहान भारतासमोर गेल्या काही लढतीत चांगला खेळला आहे, तसेच त्याने बुमराला आव्हान देताना मी त्याच्या कारकिर्दीला धक्का लागेल, अशी आक्रमक फलंदाजी करू शकतो, अशी गर्जनाही केली आहे.
अनुभवी बाबर आझम संघात खेळत असला तरी तो बरेच चेंडू धाव न काढता खेळतो, या मुद्द्यावरून चर्चा होत आहे. पाकिस्तानी संघात खरे आक्रमक मोठे फटके सहजी मारू शकणारे फलंदाज कमी असल्याची भीती पाकिस्तानी पत्रकार गप्पांदरम्यान बोलून दाखवत होते. तसेच उस्मान तारिकच्या गोलंदाजीची चर्चा होत असल्याने त्याच्यावर दडपण येईल आणि निष्णात भारतीय फलंदाज त्याच्या फिरकीवर समोर मोठे फटके मारून आक्रमण करतील, अशीही भीती बोलून दाखवली जात होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

