Mohammad Shami: वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या भारतीय संघातील महत्त्वाच्या आणि प्रमुख खेळाडूंपैकी आहे. गेल्या काही वर्षात त्याने शानदार कामगिरी केली आहे. पण त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत अनेक चढ-उतार आले आहे.
2018 साली तर त्याची विभक्त पत्नी हसीन जाहानने केलेल्या आरोपांमुळे त्याच्या कारकिर्दीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले होते. आता याच घटनांबद्दल ईशांत शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.
साल 2018 साली जहानने शमी आणि त्याच्या कुटुंबावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. तसेच त्याच्यावर मॅच फिक्सिंगचेही आरोप केले होते.
परिणामी बीसीसीआने शमीचा वार्षिक मानधन करार काही काळासाठी स्थगित केला होता. तसेच त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशानस समीतीने बीसीसीआयला याबद्दल चौकशी करण्याचेही आदेश दिले होते.
त्यामुळे बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनीटने (एसीयू) या प्रकरणाची चौकशी केली होती. नंतर शमी या आरोपांमधून निर्दोष सुटला. पण या चौकशीदरम्यान एसीयूने भारतीय संघातील सर्व खेळाडूंशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांना शमी मॅच फिक्सिंग करू शकतो का, असे विचारले होते.
याबद्दल क्रिकबझच्या 'राईज ऑफ न्यू इंडिया' या कार्यक्रमात ईशांतने माहिती दिली आहे. पण त्याने शमीविरुद्ध झालेल्या मॅच फिक्सिंगच्या चौकशीबद्दल माहिती देताना त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करणे टाळले आहे.
ईशांत शर्माने सांगितले की 'मी त्याच्याशी चर्चा केली होती त्याने मला याबद्दल बरेच काही सांगितसे होते. जे काही झाले त्यानंतर अँटी करप्शन युनिटने आमच्या सर्वांशी संपर्क साधला होता. त्यांनी आम्हाला विचारले होते शमी मॅच फिक्सिंग करू शकतो की नाही.'
'जसे पोलिस चौकशी करतात, तसे मला सर्व विचारण्यात आले आणि सर्व गोष्टींची नोंदही करण्यात आली. मी त्यांना सांगितले की मला त्याच्या वैयक्तिक गोष्टींबद्दल माहित नाही, पण मी 200 टक्के खात्रीने सांगू शकतो की तो मॅच फिक्सिंग करणार नाही. कारण मला तो चांगला माहित आहे.'
'जेव्हा मी सर्व सांगत होतो, तेव्हा शमीने ते ऐकले. त्यावेळी त्याला मी त्याच्याबद्दल काय विचार करतो, याची जाणीव झाली आणि त्यानंतर आमची मैत्री आणखी घट्ट झाली.'
सध्या ईशांत शर्मा भारतीय संघातून बाहेर आहे. पण गेली अनेकवर्षे शमी आणि ईशांतने एकत्र क्रिकेट खेळले आहे. दरम्यान, शमी सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाबरोबर आहे.