India Men's and Women's Cricket Team Performance in 2023:
भारतीय क्रिकेट संघाचे 2023 वर्षातील सर्व सामने खेळून झाले आहेत. हे वर्ष भारतीय महिला आणि पुरुष संघासाठी चढ-उतारांचे राहिले. काही अविस्मरणीय विजय या वर्षात मिळवले, तर काही कटू पराभवाचा सामनाही या वर्षात करावा लागला. भारतीय संघांच्या यावर्षीच्या कामगिरीबद्दल बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
भारतीय पुरुष संघाने या वर्षात 66 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यातील 45 सामने भारताने जिंकले, तर 17 सामने भारतीय संघ पराभूत झाला. तसेच 2 सामने अनिर्णित राहिले. त्याचबरोबर 2 सामन्याचा निकालही लागलेला नाही.
भारतीय संघाने 66 पैकी 8 कसोटी सामने या वर्षात खेळले, ज्यातील 3 सामने जिंकले आणि 3 सामने पराभूत झाले, त्याचबरोबर 2 सामने अनिर्णित राहिले. याशिवाय भारताने 35 वनडे सामने खेळताना 27 विजय मिळवले. तसेच 7 सामन्यात पराभव स्विकारला, तर 1 सामन्याचा निकाल लागला नाही. त्याचबरोबर 23 टी20 सामने खेळले, ज्यात 15 विजय आणि 7 पराभव स्विकारले.
भारतीय महिला संघाने 2023 वर्षात 19 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले, ज्यातील 11 सामन्यांत विजय मिळवला, तर 6 सामन्यांत पराभव स्विकारला.
तसेच 2 सामन्यांचा निकाल लागला नाही. याशिवाय 5 वनडे सामने खेळले, ज्यातील एकच सामन्यात विजय मिळवला, तर 3 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आणि १ सामना बरोबरीत सुटला.
तसेच भारतीय संघाने या वर्षात खेळलेल्या दोन्ही कसोटी सामन्यांत ऐतिहासिक विजय मिळवला. भारताने डिसेंबर 2023 मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना कसोटीत पराभवाचे धक्के दिले.
दरम्यान, भारतीय पुरुष संघाने 2023 वर्षात कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना आणि वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामनाही खेळला. मात्र त्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्याचबरोबर महिला क्रिकेट संघाने टी20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पराभव स्विकारला.
आसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयश आले असले, तरी भारताच्या पुरुष संघाने यंदा आशिया चषकाचे विजेतेपद नाववर केले. अंतिम सामन्यात श्रीलंकेला 10 विकेट्सने पराभूत केले.
यावर्षी चीनमध्ये झालेल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी सुवर्ण पदकाची कमाई केली.
वरिष्ठ संघाला जरी पराभवाचा धक्का बसला असला तरी 19 वर्षांखालील भारतीय महिला संघाने मात्र शानदार कामगिरी केली. शफाली वर्माच्या नेतृत्वात खेळलेल्या भारतीय महिला संघाने यावर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेला 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकप जिंकला.
याशिवाय भारतीय पुरुष संघाने द्विपक्षीय मालिकांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघांना कसोटीत पराभूत केले, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात पराभव स्विकारला. त्याचबरोबर वनडेत श्रीलंका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका या संघांना पराभूत केले.
तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोनदा वनडे मालिका खेळली, ज्यातील एकामध्ये विजय आणि एकाच पराभव स्विकारला. त्याचबरोबर टी20 मालिकेत ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझीलंड, आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांना पराभूत केले, तर वेस्ट इंडिजविरुद्ध पराभव स्विकारला.
भारतीय महिला संघाने वनडेत दोन मालिका खेळल्या, त्यातील बांगलादेशविरुद्धची मालिका 1-1 अशा बरोबरीत सुटली. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय टी२०मध्ये भारतीय महिला संघाने बांगलादेशला पराभूत केले, तर इंग्लंडविरुद्ध पराभव स्विकारला. याशिवाय कसोटीतील दोन्ही सामन्यात विजय मिळवला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.