भारत विरुद्ध इंग्लंड संघात पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना धरमशाला येथे गुरुवारपासून (7 मार्च) सुरू झाला आहे. या सामन्यात भारताने दुसऱ्या दिवस अखेर पहिल्या डावात 120 षटकात 8 बाद 473 धावा केल्या आहेत.
त्यामुळे भारताकडे पहिल्या डावात दुसऱ्या दिवस अखेर तब्बल 255 धावांची आघाडी आहे. भारताकडून पहिल्या डावात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतके केली, तर सर्फराज खान आणि पदार्पणवीर देवदत्त पडिक्कल यांनी अर्धशतके केली.
दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने पहिल्या डावात 31 व्या षटकापासून 1 बाद 136 धावांपासून खेळायला सुरुवात केली. यावेळी रोहित शर्माने 52 धावांपासून, तर शुभमन गिलने 26 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली.
या दोघांनीही सुरुवातीपासूनच विकेट जाणार नाही, याची काळजी घेण्याबरोबर फिरकीपटूंविरुद्ध आक्रमक पवित्रा स्विकारला. त्यामुळे पहिल्या सत्राक त्यांनी एकही विकेट, तर जाऊन दिली नाही, पण वैयक्तिक शतकेही पूर्ण केली.
रोहितने 58 व्या षटकात, तर गिलने 59 व्या षटकात शतक पूर्ण केले. रोहितचे हे कसोटी कारकिर्दीतील 12 वे शतक, तर गिलचे चौथे शतक ठरले.
या दोघांनीही पहिले सत्र पूर्ण खेळून काढताना इंग्लंडच्या गोलंदाजांना एकही यश मिळू दिले नाही. त्यांनी एकाच सत्रात शंभरहून अधिक धावाही जमा केल्या. अखेर दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच 62 व्या षटकात बेन स्टोक्सने रोहित आणि गिल यांची 171 धावांची भागीदारी तोडली.
स्टोक्सने एक सुरेख चेंडू टाकत रोहितच्या ऑफ स्टंपवरील बेल्स उडवले. रोहितने 162 चेंडूत 13 चौकार आणि 3 षटकारांसह 103 धावा केल्या. त्याच्या पुढच्याच षटकात जेम्स अँडरसनने शुभमन गिलला माघारी धाडत 699 वी कसोटी विकेट घेतली. गिलने १५० चेंडूत 12 षटकार आणि 5 चौकारांसह 110 धावा केल्या.
रोहित आणि गिल यांच्या विकेट्स गेल्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि सर्फराज खान यांनी भारताचा डाव सांभाळला. त्यांनी दुसऱ्या सत्रात भारताचा डाव सांभाळताना अर्धशतकी भागीदारी केली.
सुरुवातीला संयमी खेळणाफ्या सर्फराजने स्थिरावल्यानंतर फिरकीपटूंविरुद्ध आक्रमक पवित्रा स्विकारला. त्याने आक्रमक खेळताना दुसऱ्या सत्राखेर अर्धशतकही पूर्ण केले. परंतु, तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच सर्फराजला शोएब बशीरने 85 व्या षटकात बाद केले.
त्यानंतर अर्धशतक करणाऱ्या पडिक्कललाही बशीरनेच 93 व्या षटकात त्रिफळाचीत केले. सर्फराजने 60 चेंडूत 56 धावा केल्या, तर पडिक्कलने 103 चेंडूत 65 धावा केल्या. यानंतर ध्रुव जुरेल, रविंद्र जडेजा आणि आर अश्विन यांच्या विकेट्स झटपट गेल्या.
परंतु, अखेरीस कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी डाव सावरत भारताला ४७० धावांचा टप्पा पार करून दिला. बुमराह 19 धावांवर आणि कुलदीप 27 धावांवर नाबाद राहिला.
इंग्लंडकडून दुसऱ्या दिवस अखेरपर्यंत शोएब बशीरने 4 विकेट्स घेतल्या, तर टॉम हर्टलीने 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर जेम्स अँडरसन आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.