Asian Para Games 2023, India 111 Medals:
आशियाई पॅरा क्रीडा 2023 स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी नोंदवली आहे. या स्पर्धेत भारताने ऐतिहासिक यश मिळवले आहे. चीनमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताने तब्बल 111 पदके जिंकली आहेत.
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेतील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी तर ठरलीच, पण याबरोबरच प्रमुख मल्टी-स्पोर्ट्स स्पर्धेतीलही ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
आशियाई पॅरा क्रीडा 2023 स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी जिंकलेल्या 111 पदकांमध्ये 29 सुवर्ण, 31 रौप्य आणि 51 कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारतीय संघ पदकतालिकेत पाचव्या क्रमांकावर राहिला.
भारताच्या वर पहिल्या क्रमांकावर 521 पदकांसह चीन आहे. चीनने 214 सुवर्ण, 167 रौप्य आणि 140 कांस्य पदके जिंकली. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या इराणने 44 सुवर्ण, 46 रौप्य आणि 41 कांस्य असे मिळून 131 पदके जिंकली.
तिसऱ्या क्रमांकावर जपान राहिले. त्यांनी 42 सुवर्ण, 49 रौप्य आणि 59 कांस्य पदके जिंकली. त्याचबरोबर चौथ्या क्रमांकावर 103 पदकांसह कोरिया राहिले. त्यांची पदके भारतापेक्षा कमी असली, तरी कोरियाने भारतापेक्षा अधिक सुवर्णपदके जिंकली, त्यामुळे ते चौथ्या क्रमांकावर राहिले. कोरियाने 30 सुवर्ण, 33 रौप्य आणि 40 कांस्य पदके जिंकली.
विशेष म्हणजे या स्पर्धेपूर्वी चीनमध्ये 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान 19 वी आशियाई क्रीडा स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत भारताने जिंकलेल्या पदकांपेक्षा 4 पदके अधिक जिंकली आहेत.
भारताने सर्वात आधी 2010 साली झालेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत 14 पदकांसह 15 वे स्थान मिळवले होते. त्यानंतर 2014 साली देखील भारत 15 व्या आणि 2018 साली आठव्या क्रमांकावर राहिला. 2023 पूर्वी भारताने 2018 साली आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत 72 पदके जिंकली होती.
दरम्यान, यापूर्वी भारताने मल्टी स्पोर्ट्स स्पर्धेत 100 हून अधिक पदके आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 आणि राष्ट्रकुल स्पर्धा 2010 यामध्ये मिळवली आहेत.
आशियाई पॅरा क्रीडा 2023 स्पर्धेत भारताने सर्वाधिक 55 पदके ऍथलेटिक्समध्ये जिंकली आहेत. त्यानंतर 21 पदके बॅडमिंटनमध्ये जिंकली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.