Virat Kohli on reports about his earnings from social media:
रनमशीन विराट कोहली सध्याच्या स्टार फलंदाजांमध्ये गणला जातो. त्याची लोकप्रियता केवळ भारतातच नाही, तर जगभरात आहे. त्यामुळे त्याला सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोविंग आहे.
तो जगात इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोवर्स असणाऱ्या खेळाडूंमध्येही तिसऱ्याच क्रमांकावर आहे. दरम्यान, गेल्या शुक्रवारपासून त्याच्या इंस्टाग्रामवरून होणाऱ्या कमाईबद्दल बरीच चर्चा होत होती, याबद्दल आता त्यानेच मौन सोडले आहे.
शुक्रवारी एक रिपोर्ट समोर आला होता, ज्यात विराटच्या इंस्टाग्रामवरील कमाईबद्दल दावा करण्यात आला होता. त्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते की विराट एका प्रमोशनल इंस्टाग्राम पोस्टसाठी 11.45 कोटी रुपये आकारतो. याबद्दल चर्चा सुरू झाल्यानंतर विराटनेच ट्वीट करत ही माहिती चूकीची असल्याचे स्पष्ट केले.
विराटने ट्वीट केले की 'मी जीवनात मला जे काही मिळाले आहे, त्याबद्दल आभारी आणि कृतज्ञ आहे. पण माझ्या सोशल मीडिया कमाईबाबत ज्या चर्चा सुरू आहेत, त्या खऱ्या नाहीत.'
दरम्यान, जो रिपोर्ट समोर आला होता, तो हॉपर HQ चा होता. त्यात दावा करण्यात आला होता की विराट इंस्टाग्रावर सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू आहे.
दरम्यान, विराट नुकताच वेस्ट इंडिज दौऱ्यातून परतला असून आता 30 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या आशिया चषकात खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेत विराट भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू असेल.
तसेच विराट नुकेतच 18 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 15 वर्षे पूर्ण करेल. त्याने 18 ऑगस्ट 2008 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने त्याची मोठी कारकिर्द घडवली असून त्याला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचा मानही मिळाला.
विराटने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत 111 कसोटी सामने खेळले असून 49.29 च्या सरासरीने 8676 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 29 शतकांचा आणि 29 अर्धशतकांचा समावेश आहे.
तसेच वनडेत त्याने 275 सामने खेळले असून 46 शतके आणि 65 अर्धशतकांसह 57.32 च्या सरासरीने 12898 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ११५ आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 1 शतक आणि 37 अर्धशतकांसह 4008 धावा केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.