रविवारी (१० सप्टेंबर) भारत विरुद्ध पाकिस्तान संघात आशिया चषक २०२३ स्पर्धेत सुपर फोरचा सामना होत आहे. कोलंबोतील आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे. या सामन्यातून श्रेयस अय्यर बाहेर झाला आहे.
श्रेयस अय्यर न खेळण्याचे कारण भारताचा कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले आहे. नाणेफेकीवेळी रोहित शर्माने भारताच्या प्लेइंग इलेव्हनची माहिती देताना सांगितले की श्रेयसच्या पाठीत वेदना आहेत. त्याचमुळे श्रेयस या सामन्यातून बाहेर झाला आहे. त्याच्याऐवजी केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे श्रेयसला पाठीच्या दुखापतीचा त्रास गेल्या अनेक महिन्यांपासून जाणवत होता, त्याचमुळे त्याच्या पाठीवर एप्रिलमध्ये शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यानंतर त्याने या शस्त्रक्रियेतून सावरण्यासाठी बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये काम केले.
त्यानंतर दुखापतीतून पूर्ण सावरल्यानंतर त्याने आशिया चषकातून भारतीय संघात पुनरागमन केले होते. तो साखळी फेरीतील दोन्ही सामन्यात खेळला. मात्र त्याला आता पुन्हा पाठीच्या दुखापतीचा त्रास जाणवल्याने भारतीय संघाची चिंता वाढली आहे.
दरम्यान केएल राहुलला श्रेयसच्या ऐवजी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाल्याने तो आता पुनरागमन करताना दिसेल. केएल राहुलला आयपीएल २०२३ स्पर्धेत खेळताना दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यातून आता तो पूर्ण सावरला असून भारतीय संघाकडून पुनरागमन करण्यास सज्ज आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोरच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये जसप्रीत बुमराहचेही पुनरागमन झाले आहे. बुमराह त्याच्या मुलाच्या जन्मासाठी भारतात परतला होता. त्यामुळे तो नेपाळविरुद्धचा सामना खेळला नव्हता. पण आता तो भारतीय संघाशी जोडला गेला असून पाकिस्तान विरुद्ध सुपर फोरमध्ये खेळताना दिसणार आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.