MS Dhoni recalled Ian Bell after Run out at Trent Bridge Test: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर ऍशेस 2023 मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोची विकेट वादग्रस्त ठरली होती. यानंतर एमएस धोनीचा एक व्हिडिओ बराच चर्चेत आला होता.
लॉर्ड्स कसोटीत बेअरस्टो चेंडू सोडल्यानंतर पुढे चालत गेल्याचे पाहून ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरीने चेंडू स्टंपवर फेकत त्याला बाद केले होते. त्यामुळे इंग्लंड संघाने या विकेटवर नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर खिलाडूवृत्तीबद्दलही अनेक मतं व्यक्त करण्यात आली.
यानंतर अनेकांना धोनीने 12 वर्षांपूर्वी इंग्लंडचा दिग्गज खेळाडू इयान बेल विरुद्ध दाखवलेली खिलाडूवृत्ती आठवली.
झाले असे होते की 2011 मध्ये नॉटिंगघम कसोटीत इंग्लंडकडून दमदार फॉर्ममध्ये असलेल्या इयान बेलने दुसऱ्या डावात शतक केले. पण तिसऱ्या दिवशी टी ब्रेक होण्यापूर्वी इंग्लंडकडून दुसऱ्या डावात शतकी खेळी केलेला बेल आणि ओएन मॉर्गन फलंदाजी करत होते. यावेळी ६६ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मॉर्गनने डिप स्क्वेअर लेगला मोठा फटका खेळला.
त्यावेळी प्रविण कुमार तो चेंडू आडवण्यासाठी धावाला. त्याने तो चेंडू सीमारेषेजवळ आडवला. पण इकडे मॉर्गन आणि बेलला वाटले की टी ब्रेक झाला आहे, त्यामुळे बेल क्रीज सोडून जाऊ लागला. पण अभिनव मुकुंदने बेलला धावबाद केले. तिसऱ्या पंचांनीही बेलला १३७ धावांवर धावबाद दिले. त्यानंतर दोन्ही संघ टी ब्रेकसाठी गेले.
त्यावेळी प्रेक्षकांकडून भारतीय संघाची हुर्या उडवण्यात आली होती. पण जेव्हा टी ब्रेक संपवून संघ परत मैदानावर आले, तेव्हा मात्र भारतीय संघासाठी टाळ्या वाजवण्यात आल्या, कारण धोनीने कर्णधार म्हणून बेल विरुद्धचे अपील मागे घेतले होते. त्यामुळे बेल पुन्हा फलंदाजीसाठी उतरला. त्यानंतर बेलने त्या सामन्यात 159 धावांची खेळी केली होती.
अनेक रिपोर्ट्सनुसार त्यावेळी टी ब्रेकमध्ये इंग्लंडच्या सपोर्ट स्टाफमधील अँड्र्यु स्ट्रॉस आणि अँडी फ्लॉवर हे धोनीशी बोलण्यासाठी भारतीय ड्रेसिंग रुममध्ये गेले होते. त्यानंतर सचिन तेंडुलकरच्या सल्ल्यानुसार धोनीने बेलला परत बोलवण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, या घटनेमुळे धोनीला 2011-2020 या दशकातील सर्वोत्तम खिलाडूवृत्तीचा पुरस्कारही आयसीसीकडून मिळला होता.
तसेच भारताला या सामन्यात तब्बल 319 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. त्यावेळी भारतासाठी तो इंग्लंडचा दौरा खराब ठरला होता. भारताला त्या दौऱ्यात व्हाईटवॉशला सामोरे जावे लागले होते. तसेच या दौऱ्यात इंग्लंडकडून 6 डावात 84 च्या सरासरीने 504 धावांची खेळी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.