India - Australia Players wearing black armbands during 2023 WTC final: बुधवारपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना सुरू झाला आहे. द ओव्हल मैदानावर होत असलेल्या या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघाचे खेळाडू आणि पंच हाताच्या दंडाला काळी पट्टी बांधून उतरले आहेत.
या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी राष्ट्रीगीतावेळी 1 मिनिट मौनही पाळले होते.
भारतातील ओडिशामध्ये 2 जून रोजी गंभीर रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात मोठी जीवितहानी झाली होती. त्याचमुळे या अपघातात प्रभावित झालेल्या लोकांच्या स्मरणार्थ दोन्ही संघांनी मौन पाळले आणि दंडाला काळी पट्टी बांधली आहे.
याबद्दल बीसीसीआयने ट्वीट करत माहिती दिली आहे. बीसीसीआयने ट्वीट केले की 'भारतीय क्रिकेट संघाने द ओव्हल येथे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी ओडिशा रेल्वे अपघातग्रस्तांच्या स्मरणार्थ एक मिनिट मौन पाळले.'
'त्याचबरोबर भारतीय संघ या अपघातात जीव गमावलेल्यांबद्दल शोक व्यक्त करत आहे. तसेच आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबाप्रती आणि मित्रांप्रती संवेदना व्यक्त करत आहे. या दुर्घटनाग्रस्तांबरोबर आहोत, हे सांगण्यासाठी भारतीय संघ दंडाला काळी पट्टी बांधणार आहे.'
ओडिशातील बालासोर येथे 2 जूनच्या संध्याकाळी कोरोमंडल एक्सप्रेस, बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि मालगाडी यांचा एकमेकांना धडकून मोठा अपघात झाला. या अपघातात मोठी जीवितहानी झाली आहे.
सध्या समोर आलेल्या आकड्यांनुसार या अपघातात मृतांची संख्या 275 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर, 1000 हून अधिक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा भारताच्या इतिहासातील मोठ्या रेल्वे अपघातांपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे.
या अपघाताबद्दल केवळ भारतातून नाही, तर जगभरातून शोक व्यक्त होत आहे. अनेकांनी दुर्घटनाग्रस्तांसाठी मदतही देऊ केली आहे.
भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागनेही दु:ख व्यक्त करताना मदतीचा हातही पुढे केला आहे. सेहवागने या अपघातात जीव गमावलेल्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली आहे. त्याने या मुलांना सेहवाग इंटरनॅशनल बोर्डिंग स्कूलमध्ये मोफत शिक्षणाची ऑफर दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.