भारताने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा दोन गडी राखून पराभव करुन ICC पुरुष अंडर-19 विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंडर-19 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत सात गडी गमावून 244 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघाची सुरुवात खराब झाली पण सचिन आणि उदय सहारन यांच्या शतकी भागीदारीमुळे त्यांनी 7 चेंडू शिल्लक असताना अंतिम फेरीचे तिकीट बुक केले. भारतासाठी सचिनने 96 धावांची तर उदयने 81 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून ट्रिस्टन आणि माफाका यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले.
दरम्यान, प्रत्युत्तरादाखल भारताची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या पॉवरप्लेमध्येच संघाने तीन गडी गमावले होते. सलामीवीर आदर्श सिंग पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या मुशीर खानला 12 चेंडूत केवळ चार धावा करता आल्या. अर्शिन कुलकर्णी 30 चेंडूत 12 धावा करुन बाद झाला. प्रियांशू मोलियाला केवळ पाच धावा करता आल्या. मात्र, यानंतर उदय सहारन आणि सचिन यांच्यात शतकी भागीदारी झाली. सचिन 95 चेंडूत 96 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. अविनाश 10 धावांवर तर अभिषेक खाते न उघडताच बाद झाला. कर्णधार उदय सहारन 81 धावा करुन धावबाद झाला.
दुसरीकडे, फलंदाजीसाठी आमंत्रित केले तेव्हा दक्षिण आफ्रिकेने पहिल्या 10 षटकांत स्टीव्ह स्टॉक (12) आणि डेव्हिड टायगर (00) यांच्या विकेट्स गमावल्या होत्या. या दोघांनाही वेगवान गोलंदाज राज लिंबानीने (60 धावांत तीन बळी) बाद केले. त्यानंतर प्रिटोरियस आणि सेलेटस्वेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 72 धावा जोडून डाव सांभाळला. दोघांनी 22 पेक्षा जास्त षटके खेळली.
मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या शीर्ष फलंदाजांना भारतीय वेगवान गोलंदाज राज लिंबानी आणि नमन तिवारी (52 धावांत एक विकेट) यांना घायगुतीला आणले. प्रिटोरियस आणि सेलेट्सवेन देखील वेगाने धावा करण्यात अयशस्वी ठरले, परिणामी बहुतेक भागिदारीसाठी प्रति षटक चार धावांपेक्षा कमी धावा होता. डावखुरा फिरकीपटू स्वामी पांडे (38 धावांत 1 बळी) आणि मुशीर खान (43 धावांत 2 विकेट) आणि ऑफ-स्पिनर प्रियांशू मोलियाने अचूक लेन्थने गोलंदाजी करत यजमानांची वाढती धावसंख्या रोखली.
दुसरीकडे, सेलेटस्वेनलाही आपल्या अर्धशतकाचे मोठ्या डावात रुपांतर करण्यात अपयश आले आणि तिवारीच्या चेंडूवर मोलियाने त्याचा झेल घेतला. युआन जेम्स (19 चेंडूत 24 धावा) आणि ट्रिस्टन लुस (12 चेंडूत 23 धावा) यांच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या 10 षटकात 81 धावा जोडण्यात यश आले. 2014 चा चॅम्पियन दक्षिण आफ्रिका हा चालू स्पर्धेत भारतीय संघाविरुद्ध 200 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला संघ आहे. आता, भारतीय संघ अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी भिडणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.