

तिरुअनंतपुरम: टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत उतरण्यापूर्वी भारतीय संघ शनिवारी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. स्पर्धेसाठी तयारी पूर्ण झालीय, तरीही सामन्यात प्रयोग करणार की पूर्ण ताकदिनीशी खेळणार, हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिले तीन सामने सहज जिंकून मालिका खिशात टाकणाऱ्या भारतीय संघाने चौथ्या सामन्यात प्रामुख्याने गोलंदाजीबाबत प्रयोग केले आणि न्यूझीलंडने दोनशे पार धावा केल्या. या आव्हानासमोर भारताचे प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यामुळे ५० धावांच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता.
त्या सामन्यात हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे हे गोलंदाजीसाठी दोन पर्याय असतानाही पाचच प्रमुख गोलंदाजांना गोलंदाजी देण्यात आली होती. भारतीय संघाचा हा प्रयोग फसला होता. त्यामुळे उद्याही याच धोरणानुसार खेळ केला जाणार की परिस्थितीनुसार रणनीती करून विजयासाठी प्रयत्न केले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या दोन सामन्यांत ‘मिस्ट्री स्पिनर’ वरुण चक्रवर्तीला विश्रांती देण्यात आली होती. विश्वकरंडक स्पर्धेसाठी त्याची जादू राखून ठेवण्यासाठी उद्याही त्याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता अधिक आहे. पहिल्या सामन्यात स्वतःच्या गोलंदाजीवर झेल पकडताना अक्षर पटेलच्या बोटाला चेंडू लागला होता.
त्यामुळे रक्तस्राव झाला होता. त्यानंतर अक्षरला पुढच्या सामन्यांत खेळवण्यात आलेले नाही. त्याच्या तंदुरुस्तीबाबत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे तो सामन्यात खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह असेल, अशा परिस्थितीत कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई यांच्यावर मदार असेल.
गेल्या दोन सामन्यांत ‘मिस्ट्री स्पिनर’ वरुण चक्रवर्तीला विश्रांती देण्यात आली होती. विश्वकरंडक स्पर्धेसाठी त्याची जादू राखून ठेवण्यासाठी उद्याही त्याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता अधिक आहे.
मोठ्या अपेक्षा असलेला यष्टीरक्षक फलंदाज आणि सलामीला खेळणाऱ्या संजू सॅमसनने अपेक्षाभंग केलेला आहे. विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम संघात स्थान कायम ठेवायचे असेल, तर विश्वास मिळवण्यासाठी त्याला उद्याच्या सामन्यात धावा कराव्याच लागणार आहे. उद्याचा हा सामना घरच्या मैदानावर होत असल्यामुळे सॅमसनला फॉर्म मिळण्याची अपेक्षा आहे.
ईशान किशनला चौथ्या सामन्यात खेळवण्यात आले नव्हते. दुखापत झाल्याचे सांगण्यात आले होते, परंतु ही दुखापत कोणत्या स्वरूपाची आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही.
अभिषेक शर्मा गेल्या दोन वर्षांपासून भलताच आक्रमक खेळ करत आहे. असे फलंदाज गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत असतात, परंतु अचूक टप्प्यावर मारा करून त्याच्यावरील दडपण वाढवणे हेच आमच्या हाती असते आणि तो प्रयत्न उद्याच्या सामन्यात असेल, असे मत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने व्यक्त केले.
विशाखापट्टणम येथे झालेल्या चौथ्या सामन्यात हेन्रीने पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माला बाद केले होते. अभिषेक केवळ आंतरराष्ट्रीय सामन्यांतच नव्हे, तर आयपीएलमध्येही अशीच बेधडक फलंदाजी करतो.
गोलंदाज म्हणून त्याच्यावर कसे दडपण टाकतो हेच महत्त्वाचे आहे, त्यासाठी अचूकता हेच अस्त्र परिणाकारक ठरू शकते, असे हेन्रीने सांगितले.
भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या या मालिकेत खेळण्याचा अनुभव आम्हाला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी निश्चितच होईस, असा विश्वास हेन्रीने व्यक्त केला. टीम साऊदी आणि ट्रेंट बोल्ट यांच्या निवृत्तीनंतर हेन्री हा न्यूझीलंडचा तिन्ही प्रकारातील हुकमी गोलंदाज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.