India vs Australia, 1st Test: नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून (9 फेब्रुवारी) सुरू झाला आहे. या सामन्यातून भारताकडून सूर्यकुमार यादव आणि केएस भरत यांचे कसोटी पदार्पण झाले. यावेळी त्यांचे कुटुंबिय देखील उपस्थित होते.
नाणेफेकीपूर्वी सूर्यकुमार आणि केएस भरतला त्यांच्या पदार्पणाच्या कॅप देण्यात आल्या. सूर्यकुमारला भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते, तर केएस भरतला 99 वा कसोटी सामना खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराकडून पदार्पणाची कॅप देण्यात आली.
त्यामुळे कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व करणारा सूर्यकुमार 304 वा आणि केएस भरत 305 वा खेळाडू ठरला. दरम्यान, यावेळी या दोघांच्याही कुटुंबातील सदस्य स्टेडियममध्ये उपस्थितीत होते. त्यांचा फोटोही बीसीसीआयने शेअर केला आहे.
केएस भरत आणि आईच्या फोटोने वेधले लक्ष
दरम्यान, केएस भरत कसोटी पदार्पण करत असल्याचे समजल्यानंतर त्याची आई मैदानात आली होती. यावेळी तिने त्याला मिठी मारत त्याचे कौतुकही केले. या क्षणाचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेक युजर्सकडून त्यावर प्रेम व्यक्त केले जात आहे.
केएस भरतला ऋषभ पंतच्या जागेवर भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संधी मिळाली आहे. पंतचा डिसेंबर 2022 च्या अखेरीस कार अपघात झाला होता. या अपघातामुळे झालेल्या दुखापतीतून तो सध्या सावरत असल्याने क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे केएस भरतला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाने यष्टीरक्षक म्हणून पसंती दिली आहे.
केएस भरतने यापूर्वी भारतीय अ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच तो जून-जुलै 2022 मधील इंग्लंड दौऱ्यात लिसेस्टरशायर विरुद्ध भारताकडून चारदिवसीय सराव सामनाही खेळला होता. त्यावेळी त्याने पहिल्या डावात नाबाद 70 आणि दुसऱ्या डावात 43 धावांची खेळी केली होती.
तसेच 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत दुखापतग्रस्त वृद्धिमान साहाऐवजी बदली यष्टीरक्षक म्हणून यष्टीरक्षण केले होते.
त्याचबरोबर डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पंतला क्रँप आल्याने केएस भरतनेच बदली यष्टीरक्षक यष्टीरक्षण केले होते. पण आता अखेर त्याला अधिकृतरित्या भारताकडून कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.
पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन -
ऑस्ट्रेलिया संघ: डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्हन स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लायन, टॉड मर्फी, स्कॉट बोलँड
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.