
IND vs AUS, 3rd ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला. राजकोटच्या मैदानावर भारताला 66 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने 353 धावांचे लक्ष्य दिले होते.
प्रत्युत्तरात भारताचा डाव 49.4 षटकांत 286 धावांवर आटोपला. कर्णधार रोहित शर्माने 57 चेंडूंत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 81 धावांची खेळी खेळली. विराट कोहलीने 61 चेंडूत 56 धावा केल्या. त्याने 5 चौकार आणि 1 षटकार मारला.
मात्र, भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली. भारताने पहिला एकदिवसीय सामना 5 धावांनी तर दुसरा सामना 99 धावांनी जिंकला.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने (Australia) निर्धारित 50 षटकांत 7 गडी गमावून 352 धावा केल्या. सलामीवीर मिचेल मार्शने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 84 चेंडूत 13 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 96 धावांची खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमराहने तीन, कुलदीप यादवने दोन, तर मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णाने प्रत्येकी एक विकेट घेतली.
दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली. रोहित आणि वॉशिंग्टन सुंदर (30 चेंडूत 18) यांनी पहिल्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली.
दहाव्या षटकात सुंदर बाद झाला. रोहित आणि कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. रोहितने 21व्या षटकात आणि कोहलीने 27व्या षटकात विकेट गमावली. तिघेही मॅक्सवेलच्या जाळ्यात अडकले.
श्रेयस अय्यर (43 चेंडूत 48, एक चौकार, दोन षटकार) आणि केएल राहुल (KL Rahul) (30 चेंडूत 26, दोन चौकार) यांनी चौथ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली आणि भारताला 220 च्या पुढे नेले. दरम्यान, सूर्यकुमार यादव (8) फ्लॉप ठरला.
मॅक्सवेलने 39व्या षटकात अय्यरला बोल्ड केले. यानंतर भारताची स्थिती खराब होत गेली. रवींद्र जडेजाला (36 चेंडूत 35, तीन चौकार, एक षटकार) दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही. जोश हेझलवूडने दोन तर मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, कॅमेरॉन ग्रीन आणि तन्वीर संघाने प्रत्येकी एक विकेट घेतली.
दुसरीकडे, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली होती. डेव्हिड वॉर्नर (34 चेंडूत 56, सहा चौकार, चार षटकार) आणि मार्श यांनी पहिल्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली.
मात्र, ही भागीदारी प्रसिद्ध कृष्णाने नवव्या षटकात मोडली. मार्शने स्टीव्ह स्मिथसोबत (61 चेंडूत 74 धावा, आठ चौकार, एक षटकार) दुसऱ्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी केली. 27व्या षटकात मार्श कुलदीपचा तर स्मिथ 32व्या षटकात सिराजचा बळी ठरला.
यानंतर मार्नस लॅबुशेनने (58 चेंडूत 72 धावा, नऊ चौकार) फटकेबाजी केली. मात्र, मार्शला दुसऱ्या टोकाकडून फारशी साथ मिळाली नाही. अॅलेक्स कॅरी (11), ग्लेन मॅक्सवेल (5) आणि कॅमेरॉन ग्रीन (9) म्हणावी तशी फलंदाजी करु शकले नाहीत.
लॅबुशेनने कर्णधार पॅट कमिन्ससोबत (22 चेंडूत नाबाद 19) आठव्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली. 49व्या षटकात लॅबुशेन पॅव्हेलियनमध्ये परतला. मिचेल स्टार्क एक धाव घेतही नाबाद राहिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.