Samantha Ruth Prabhu on MS Dhoni: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. या स्पर्धेदरम्यान लाखो चाहते आपल्या आवडत्या खेळाडूंना आणि संघांना पाठिंबा देताना दिसले.
त्यातही चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीला सर्वाधिक पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट दिसून आले. आता धोनीबद्दलच भारताची लोकप्रिय अभिनेत्री संमंथा रुथ प्रभूनेही मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
तिने सांगितले आहे की धोनी तिचा आवडता खेळाडू आहे. नुकत्याच विजय देवरकोंडासह स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या एका मुलाखतीत समंथाने धोनी आणि विराट कोहलीबद्दल भाष्य केले आहे. तिला तिच्या आवडत्या खेळाडूबद्दल विचारण्यात आले.
तसेच धोनीही चेन्नई संघाकडून खेळतो, त्यादृष्टीने तिला विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना तिने सांगितले की 'धोनी जेवढा रांचीचा आहे, तेवढाच तो चेन्नईचाही आहे.
तो परिपूर्ण आहे. मला त्याच्या डोक्यात घुसून तो कसे कार्य करतो आणि शांत कसा राहातो, तेही कोणत्याही कठीण परिस्थितीतही शांत कसा राहातो, हे पाहायचे आहे.'
याशिवाय तिने विराटदेखील तिला प्रेरणा देत असल्याचे सांगितले. तिने विराटने जेव्हा ३ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर त्याचे 71 वे आंतरराष्ट्रीय शतक केले होते. त्या घटनेची आठवणही सांगितली.
तिने सांगितले की 'जेव्हा विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत शतक केले होते (71 वे शतक) तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले होते. तो अद्भुत आहे, तो प्रेरणादायी आहे.'
दरम्यान, या मुलाखतीवेळी समंथा आणि विजय देवरकोंडाला एक गेमही खेळण्यासाठी सांगितला होता, ज्यात एकाला क्रिकेटपटूंची नक्कल करायची होती आणि दुसऱ्याला त्यावरून त्या क्रिकेटपटूचे नाव ओळखायचे होते. यावेळी हे दोघेही क्रिकेटपटूंची गमतीशीर नक्कल करताना दिसले होते.
दरम्यान, आयपीएल 2023 स्पर्धेबद्दल सांगायचे झाल्यास 60 सामने पूर्ण झाले असून साखळी फेरीतील अद्याप 10 सामने बाकी आहेत. त्यानंतर 23 मे पासून प्लेऑफला सुरुवात होणार आहे.
23 आणि 24 रोजी क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटरचा सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर 26 मे रोजी क्वालिफायर 2 सामना होईल, तर 28 मे रोजी अंतिम सामना होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.