MS Dhoni: The Untold Story Re-Release: भारताचा माजी क्रिकेट कर्णधार एमएस धोनी हा भारतातीलच नाही, जगभरातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्याचा अफाट चाहता वर्ग असून तो विविधप्रकारे त्याच्यावरील प्रेम व्यक्तही करत असतो. आता त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
धोनीच्या आयुष्यावर आधारीत 'एमएस धोनी - द अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये पाहाता येणार आहे. हा चित्रपट सर्वात पहिल्यांदा 2016 साली सर्वत्र प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. तसेच बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने मोठी कमाई केली होती.
आता तोच चित्रपट पुन्हा एकदा केवळ भारतीय थिएटर्समध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. 12 मे रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये पुन्हा हा चित्रपट चाहत्यांना थिएटरमध्ये पाहाता येणार आहे.
याबद्दल डिज्नी स्टारचे स्टुडिओ प्रमुख बिक्रम डुग्गल यांनी सांगितले की 'एमएस धोनी- द अनटोल्ड स्टेरी हा केवळ स्टार स्टुडिओसाठीच नाही, तर जगभरातील भारतीयांसाठी हा चित्रपट खास ठरला होता. यामध्ये सर्वात यशस्वी कर्णधाराचा प्रेरणादायी प्रवास दाखवण्यात आला होता. चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यामागे देशभरातील त्याच्या चाहत्यांना मोठ्या पडद्यावर क्रिकेटचे जादुई क्षण पुन्हा अनुभवण्याची आणखी एक संधी देणे आहे, हे कारण आहे.'
नीरज पांडे दिग्दर्शित या चित्रपटात दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने धोनीची भूमिका निभावली होती. या भूमिकेसाठी सुशांतचे खूप कौतुकही करण्यात आलेले. त्याच्या कारकिर्दीला या चित्रपटाने मोठे वळण दिले होते. त्याला अनेक पुरस्कार सोहळ्यांसाठी नामांकनेही मिळाली. त्याने या चित्रपटासाठी तयारी करताना बरीच महिने मेहनतही घेतली होती.
सुशांत व्यतिरिक्त या चित्रपटात कियारा अडवाणी, दिशा पटाणी, अनुपम खैर, भुमिका चावला यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो सध्या आयपीएलमध्येच खेळताना दिसतो. सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या 16 व्या हंगामातही तो चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करताना दिसत आहे.
दरम्यान, हा त्याच्या अखेरच आयपीएल हंगाम असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत असली तरी, धोनीने म्हटले आहे की हे त्याचे अखेरचा आयपीएल हंगाम असल्याचे तुम्ही ठरवले आहे, मी नाही. त्यामुळे अजूनही धोनीच्या आयपीएलमधील निवृत्तीबद्दलचा निर्णय गुलदस्त्यातच आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.