ICC ODI Cricket World Cup Australia vs Sri Lanka, Heavy Winds :
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सोमवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना पार पडला. लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्सने विजय मिळवला.
या विजयासह ऑस्ट्रेलियाने पहिल्या विजयाची नोंद केली. तथापि, या सामन्यात नैसर्गिक व्यत्यय आला होता, त्यामुळे चाहत्यांची काही प्रमाणात धावपळही झाली.
या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे श्रीलंकेकडून पाथम निसंका आणि कुशल परेरा यांनी डावाची सुरुवात केली, त्यांनी दमदार सुरुवात देताना अर्धशतके पूर्ण केली, याबरोबरच 125 धावांची भागीदारीही केली.
पण पॅट कमिन्सने या दोघांनाही बाद केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने सामन्यात पुनरागमन करत श्रीलंकेला 44 षटकांच्या आतच 209 धावांवर रोखले. दरम्यान, श्रीलंकेची फलंदाजी सुरू असताना पावसामुळे काहीवेळ सामना थांबला होता.
तसेच त्यानंतर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु होण्यासाठीही वेळ गेला. यावेळी लखनऊमध्ये सोसाट्याचा वारा सुटला होता.
श्रीलंकेचा संघ सर्वबाद झाल्यानंतर लखनऊमध्ये जोरजोरात वारं वाहत होतं. यामुळे अगदी स्टेडियमच्या स्टँडमधील बॅनरही उडाले. काही होर्डिंग्स मैदानातही आले. त्यामुळे अगदी चाहत्यांनाही त्यांच्या सुरक्षेसाठी स्टँडच्या सर्वात वरच्या बाजूला जाण्यास सांगण्यात आले होते. सुदैवाने कोणताही चाहता जखमी झाला नाही.
त्याचबरोबर पंचांनी नंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स आणि ऑस्ट्रेलियन संघातील इतर खेळाडूंशी चर्चा केली. त्यानंतर मैदान स्वच्छ करण्यात आल्यानंतर सामना सुरू झाला.
दरम्यान, सामन्याबद्दल सांगाचे झाले, तर श्रीलंकेने दिलेल्या 210 धावांच्या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने 35.2 षटकात पूर्ण केला. ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिसने सर्वाधिक 58 धावांची खेळी केली. तसेच मिचेल मार्शने 52 धावांची खेळी केली.
त्याचबरोबर मार्नस लॅब्युशेनने 40 धावांची खेळी केली, तर ग्लेन मॅक्ववेलने नाबाद 31 धावांची खेळी केली, तर मार्कस स्टॉयनिसने नाबाद 20 धावा केल्या.त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 210 धावांचे आव्हान अवघ्या 35.2 षटकात 5 विकेट्स गमावत पूर्ण केला.
गोलंदाजीत श्रीलंकेकडून दिलशान मदुशनकाने 3 विकेट्स घेतल्या. तसेच दुनिथ वेलालागेने 1 विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत ऍडम झम्पाने 4 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मिचेल मार्श आणि पट कमिन्स यांनी 2 विकेट्स घेतल्या. तसेच ग्लेन मॅक्सवेलने एक विकेट घेतली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.