ICC ODI Cricket World Cup 2023 matches live streaming details:
क्रिकेट म्हटलं की अनेकांना दर चार वर्षांनी होणारा वर्ल्डकप आठवतो, त्याच्या चर्चाही रंगतात. आत्तापर्यंत वनडे वर्ल्डकपचे 12 पर्व यशस्वी पार पडले आहेत. त्यामुळे सर्वांना उत्सुकता आहे ती भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपच्या 13 व्या पर्वाची आणि आता हे नवं पर्व सुरू होण्याची वेळ आली आहे.
भारतात गुरुवारपासून म्हणजेच 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होत आहे. पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात म्हणजे गतविजेत्या आणि गतउपविजेत्या संघात खेळवला जाणार आहे. हा सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर म्हणजेच अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
या सामन्याने वर्ल्डकप 2023 स्पर्धेला सुरूवात होईल. यापुढे हा क्रिकेटचा महाकुंभ 19 नोव्हेंबरपर्यंत सुरू असेल. 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी अनुक्रमे मुंबई आणि कोलकाता येथे उपांत्य सामने पार पडतील, तर 19 नोव्हेंबरला अहमदाबादलाच होणाऱ्या अंतिम सामन्याने या स्पर्धेची सांगता होईल.
वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स हे 10 संघ सहभागी झाले आहेत. या 10 संघात 46 दिवसांमध्ये 48 सामने खेळवण्यात येणार आहेत. यात 45 साखळी फेरीतील सामने आहेत, तर दोन उपांत्या सामने आणि एक अंतिम सामन्याचा समावेश आहे.
या स्पर्धेतील सर्व सामने मिळून हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलाकाता या 10 शहरात होणार आहेत.
दरम्यान, उपांत्य सामने आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस असणार आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत जर हे सामने पूर्ण होऊ शकले नाहीत, तर राखीव दिवशी सामना खेळवला जाईल.
सहभागी 10 संघ साखळी फेरीत एकमेकांविरुद्ध खेळतील म्हणजेच प्रत्येक संघ एकूण 9 साखळी सामने खेळणार आहे. त्यानंतर गुणतालिकेतील पहिले चार संघ उपांत्य फेरीत खेळतील, तर उपांत्य सामन्यातील विजेते संघ अंतिम सामन्यात भिडणार आहेत.
या वर्ल्डकपमधील सामन्यांना सुरुवात होण्यासाठी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10.30 वाजता आणि दुपारी 2 वाजताची वेळ ठरवण्यात आली आहे. दरम्यान, 48 सामन्यांपैकी केवळ 6 सामनेच सकाळी 10.30 वाजता सुरू होणार आहेत. बाकी 42 सामने दुपारी 2 वाजता सुरू होतील.
सकाळी 10.30 वाजता सुरू होणारे सामने
बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान (7 ऑक्टोबर),इंग्लंड विरुद्ध बांगलादेश (10 ऑक्टोबर) नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका (21 ऑक्टोबर), ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (28 ऑक्टोबर), न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (4 नोव्हेंबर) आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश (11 नोव्हेंबर) हे सहा सामने सकाळी 10.30 वाजता सुरू होतील. याव्यतिरिक्त सर्व सामने दुपारी 2 वाजता सुरू होणार आहेत.
वर्ल्डकप 2023 सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण भारतात टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर दिसणार आहे. तसेच डिज्नी+हॉटस्टार या ऍप किंवा वेबसाईटवरही या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण मोफत पाहाता येणार आहे. याशिवाय विविध देशांमध्ये वेगवेगळ्या चॅनेल्सवर या स्पर्धेतील सामने दिसणार आहेत.
8 ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर - भारत विुरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
14 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड, धरमशाला
29 ऑक्टोबर - भारत विरुद्ध इंग्लंड, लखनऊ
2 नोव्हेंबर - भारत विरुद्ध पात्रता फेरीतून आलेला संघ, मुंबई
5 नोव्हेंबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
12 नोव्हेंबर - भारत विरुद्ध पात्रता फेरीतून आलेला संघ, बंगळुरू
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.