ICC ODI Cricket World Cup 2023 TV Viewership:
भारतात होणारी वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा आता दुसऱ्या टप्प्यात पोहचली असल्याने रोमांच अधिक वाढलेला दिसत आहे. प्रत्येक सामन्यात वेगवेगळे विक्रम तुटताना दिसत आहेत. अशात आणखी एक नवा विक्रम यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेने केला आहे, ज्याबद्दल बीसीसीआय सचिव जय शाह यांनीही माहिती दिली आहे.
ही स्पर्धा भारतात डिज्नी स्टारच्या चॅनल्सवर दिसत आहे. दरम्यान, डिज्नी स्टारने BARC डेटाची माहिती दिली आहे. पहिल्या 18 सामन्यांच्या डेटाची आकडेवारी समोर आली आहे. यानुसार वर्ल्डकप 2023 मधील पहिल्या 18 सामन्यांचे थेट प्रक्षेपण तब्बल 223.8 अब्ज मिनिटे युजर्सने पाहिले आहे.
याबद्दल जय शाह यांनी माहिती दिली की गेल्या वर्ल्डकप स्पर्धेपेक्षा म्हणजेच 2019 साली इंग्लंड आणि वेल्स येथे झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेपेक्षा ही आकडेवारी तब्बल 43 टक्क्याने वाढली आहे.
त्याचबरोबर जय शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पहिले 18 सामने टीव्हीवर तब्बल 36.42 कोटी लोकांनी पाहिले. हा देखील वर्ल्डकपच्या इतिहासातील एक मोठा विक्रम आहेत. जय शाह यांनी ही आकडेवारी मांडताना सांगितले की या 'आकडेवारीतून भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या ताकदीचा आणि क्रिकेटच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.'
दरम्यान, याच वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 22 ऑक्टोबर रोजी भारत आणि न्यूझीलंड संघात झालेल्या सामन्याने डिजिटल प्लॅटफॉर्मवरील व्ह्युवरशिपचा विक्रम मोडला.
भारत आणि न्यूझीलंड संघात झालेला हा सामना डिज्नी प्लस हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर 4.3 कोटी युजर्सने एकाचवेळी पाहिला. डिजिटल प्लॅटफॉर्मच्या इतिहासात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याला मिळालेले हे सर्वाधिक युजर्स आहेत.
5 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या वर्ल्डकप स्पर्धेतील आत 28 ऑक्टोबर पर्यंत 28 सामने खेळून झाले आहेत. या स्पर्धेतील अद्याप 20 सामने बाकी आहेत, यात 17 साखळी सामने आहेत, तर 3 बाद फेरीतील सामन्यांचा समावेश आहे. त्यामुळे ही स्पर्धा रोमांचक वळणावर आली आहे.
आता संघ गुणतालिकेत पहिल्या चार क्रमांकावर स्थान मिळवण्यासाठी आतुर आहेत. सध्या 28 सामन्यांनंतर पहिल्या चार संघांमध्ये दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, भारत आणि ऑस्ट्रेलिया हे चार संघ आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.