U19 World Cup 2024 स्पर्धेचे वेळापत्रक घोषित! युवा टीम इंडिया 'या' संघांशी करणार दोन हात

U19 World Cup 2024 Schedule: ICC ने 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे.
Team India | U19 World Cup
Team India | U19 World CupX/ICC

ICC announced Schedule for U19 Men’s Cricket World Cup 2024:

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी (11 डिसेंबर) 15 व्या 19 वर्षांखालील पुरुष वनडे वर्ल्डकप स्पर्धेचे वेळापत्रक घोषित केले आहे. हा वर्ल्डकप पुढीलवर्षी 19 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2024 दरम्यान दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात येणार आहे.

खरंतर हा वर्ल्डकप आधी श्रीलंकेमध्ये खेळवण्यात येणार होता. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे श्रीलंकेवर आयसीसीने बंदी घातली. त्यामुळे 19 वर्षांखाली वर्ल्डकप 2024 श्रीलंकेतून दक्षिण आफ्रिकेला हलवण्यात आला.

दरम्यान आता दक्षिण आफ्रिकेतील ब्लोएमफाँटेन, ईस्ट लंडन, किम्बर्ली, पॉचेफस्ट्रूम आणि बेनोनी या पाच ठिकाणी 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील एकूण 41 सामने खेळवण्यात येणार आहेत.

Team India | U19 World Cup
U19 Asia Cup: 'बाप'माणूस ज्याने घडवले दोन क्रिकेटपटू! सर्फराजनंतर आता मुशीर करणार टीम इंडियाकडून पदार्पण

पहिल्या दिवशी यजमान दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पॉचेफस्ट्रूमला, तर आयर्लंड विरुद्ध युएसए यांच्यात ब्लोएमफाँटेनला सामना खेळवण्यात येणार आहे. पाचवेळचा विजेता भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सामना 20 जानेवारी रोजी बांगलादेशविरुद्ध ब्लोएमफाँटेनला खेळणार आहे.

16 संघात रंगणार स्पर्धा

19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. या 16 संघांची साखळी फेरीसाठी चार गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात 4 संघांचा समावेश आहे.

अ गटात भारतासह बांगलादेश, आयर्लंड आणि युएसए या संघांचा समावेश आहे. तसेच ब गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड या चार संघांचा समावेश आहे, तर क गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि नामिबिया हे चार संघ आहेत. ड गटात अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि नेपाळ हे चार संघ सामील आहेत.

दरम्यान, साखळी फेरीनंतर या चार गटातील अव्वल तीन संघ सुपर सिक्स फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर अ आणि ड गटातील तीन-तीन संघांचा एक गट केला जाईल आणि ब आणि क गटातील तीन-तीन संघांचा एकत्र दुसरा गट केला जाईल.

सुपर सिक्स फेरीत प्रत्येक संघ साखळी फेरीतील गटातील संघांशी सामना खेळणार नाही. त्यांच्यातील निकाल सुपर सिक्स फेरीत कायम केला जाईल. तसेच दुसऱ्या गटातील त्याच क्रमांकावरील संघाशीही सामना खेळणार नाही. म्हणजेच प्रत्येक संघ सुपर सिक्समध्ये केवळ प्रत्येकी २ सामने खेळेल.

उदाहरणार्थ साखळी फेरीतील अ गटातील अव्वल क्रमांकाचा संघ अ गटातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघांशी खेळणार नाही. त्यांच्याविरुद्ध साखळी फेरीत आधीच सामना खेळलेला असल्याने त्याच सामन्यांचा निकाल सुपर सिक्समध्ये कायम केला जाईल.

तसेच अ गटातील अव्वल संघ ड गटात अव्वल राहणाऱ्या संघाशीही सामना खेळणार नाही. त्यामुळे ड गटातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघांची अ गटातील अव्वल क्रमांकावर राहणाऱ्या संघाचा सामना होईल.

सुपर सिक्स फेरीनंतर अव्वल चार संघ उपांत्य फेरी खेळतील. उपांत्य फेरीतील विजेते दोन संघ 11 फेब्रुवारीला अंतिम सामन्यात भिडतील. बेनोनीमध्ये उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होणार आहे. उपांत्य फेरीतील सामने 6 आणि 8 फेब्रुवारीला होणार आहेत.

साखळी फेरी 19 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान होईल, त्यानंतर 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान सुपर सिक्स फेरी होईल.

दरम्यान, या स्पर्धेतील सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता चालू होणार आहेत.

Team India | U19 World Cup
U19 T20I World Cup विजेत्या टीम इंडियाचा विशेष सन्मान, मास्टर-बास्टर म्हणाला, 'तुमचे यश...'; Video

दक्षिण आफ्रिकेत 1998 आणि 2020 मध्ये 19 वर्षांखालील वर्ल्डकप खेळवण्यात आला होता. 2020 मध्ये भारताने वर्ल्डकप जिंकला होता.

असे आहे भारताचे वेळापत्रक

युवा भारतीय संघ साखळी फेरीत 20 जानेवारीला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध खेळल्यानंतर 25 जानेवारीला आयर्लंडविरुद्ध ब्लोएमफाँटेन येथेच दुसरा सामना खेळेल. तसेच 28 जानेवारीला ब्लोएमफाँटेनलाच युएसएविरुद्ध साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळेल. या सामन्यांनंतर जर भारतीय संघ अ गटात पहिल्या तीन क्रमांकांमध्ये राहिला, तर सुपर सिक्स फेरी खेळेल.

सराव सामने

19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी सराव सामने 13 ते 17 जानेवारी 2024 दरम्यान दक्षिण आफ्रिकेत खेळले जाणार आहेत. भारताचा पहिला सराव सामना 13 जानेवारीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि 17 जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com