U19 T20I World Cup विजेत्या टीम इंडियाचा विशेष सन्मान, मास्टर-बास्टर म्हणाला, 'तुमचे यश...'; Video

१९ वर्षांखालील महिला टी२० वर्ल्डकप जिंकणाऱ्या युवा भारतीय महिला संघाचा सचिन तेंडुकरच्या हस्ते गौरव करण्यात आला.
Sachin Tendulkar felicitated U19 India Women Team
Sachin Tendulkar felicitated U19 India Women TeamDainik Gomantak

U19 India Women Team: भारताच्या १९ वर्षांखालील महिला संघाने शफाली वर्माच्या नेतृत्वाखाली रविवारी (२९ जानेवारी) पहिल्या १९ वर्षांखालील महिला टी२० वर्ल्डकप जिंकला. याबद्दल त्यांचा बुधवारी (१ फेब्रुवारी) बीसीसीआयकडून मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेत यंदा पहिल्यांदाच १९ वर्षांखालील महिला टी२० वर्ल्डकप खेळवण्यात आला होता. या स्पर्धेत अंतिम सामन्यात रविवारी भारताच्या युवा महिला संघाने १९ वर्षांखालील इंग्लंड महिला संघाला ७ विकेट्सने पराभूत केले होते आणि विश्वविजेतेपदावर नाव कोरले होते.

त्यामुळे भारताच्या या युवा महिला संघाचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. दरम्यान, बुधवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड या पुरुष संघांमध्ये टी२० मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादला नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यापूर्वी स्टेडियममध्ये विश्वविजेत्या १९ वर्षांखालील भारतीय महिला संघाचा सन्मान झाला.

(Sachin Tendulkar felicitated U19 India Women before for Winning U19 Women's T20I World Cup 2023)

या सन्मान सोहळ्यादरम्यान सचिन तेंडुलकरने विश्वविजेत्या युवा भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देताना म्हटले की 'मी पहिल्यांदा आपल्या १९ वर्षांखालील महिला संघाचे अभिनंदन करतो.हे खूप मोठे यश आहे आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो, संपूर्ण देश आणि भारतीय क्रिकेटचे हितचिंतक तुमचे हे यश येणारी अनेक वर्षे सेलिब्रेट करतील आणि आठवणीत ठेवतील.'

'मी १९८३ साली जेव्हा १० वर्षांचा होतो, तेव्हा स्वप्न पाहिले होते (वर्ल्डकप जिंकण्याचे). पण तुम्ही हा वर्ल्डकप जिंकून अनेक स्वप्नांना जन्म दिला आहे. भारतात आणि बाहेरीलही अनेक युवा मुलींना तुम्ही प्रेरणा दिली आहे. तुमचे त्याबद्दल खूप अभिनंदन. तुम्ही आता आदर्श बनला आहात. मला विश्वास आहे तुम्ही अधिक मजबूत व्हाल आणि तुम्ही अजून यश मिळवून देशाचा गौरव वाढवाल.'

यानंतर सचिनबरोबर बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी मिळून विश्वविजेत्या १९ वर्षांखालील भारतीय संघाची कर्णधार शफाली आणि संघातील इतर खेळाडूंना ५ कोटी रुपयांचे बक्षीसही दिले.

जय शहा यांनी यापूर्वीच बीसीसीआयकडून या युवा संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी ५ कोटींचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार संघाकडे हे बक्षीस सुपूर्त करण्यात आले.

सन्मान सोहळ्यानंतर भारताच्या या विश्वविजेत्या खेळाडूंनी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० सामन्याचाही आनंद घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com