Ishan Kishan on MS Dhoni: भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडविरुद्ध 27 जानेवारीपासून तीन सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना रांचीमध्ये पार पडणार आहे. दरम्यान, या मालिकेपूर्वी बीसीसीआयशी बोलताना ईशान किशनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील काही महत्त्वाच्या घटनांचा खुलासा करताना एमएस धोनीबद्दलच्या आठवणीही सांगितल्या आहेत.
बीसीसीआयने गुरुवारी यष्टीरक्षक फलंदाज ईशानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये ईशानने धोनी त्याचा आदर्श आहे असे सांगितले. तसेच त्याने असेही म्हटले की भारतीय संघात धानीची जागा भरून काढायची आहे.
बिहारमधील पटना येथे जन्मलेला ईशान देशांतर्गत क्रिकेट झारखंडकडून खेळतो. त्यामुळे त्याने झारखंडकडून धोनीबरोबर क्रिकेटही खेळले आहे. धोनीदेखील झारखंडकडून क्रिकेट खेळला आहे. तसेच धोनीची दिग्गज कर्णधार आणि यष्टीरक्षकांमध्ये गणना होत असते.
दरम्यान ईशानने सांगितले की 'मी मोठा होत असताना माझा क्रिकेटमधील आदर्श एमएस धोनी होता. तो मी जिथून आलो, तिथूनच पुढे आला आणि त्यानेही झारखंडसाठी क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे मला त्याची जागा भरून काढायची आहे आणि मी आता इथे असून मी माझ्या संघाला अनेक सामने जिंकून देईल, याची काळजी घेईल.'
त्याचबरोबर धोनीबरोबरच्या पहिल्या भेटीची आठवण सांगिताना ईशान म्हणाला, 'मी एकदा एमएस धोनीची स्वाक्षरी मागितली होती. तेव्हा मी 18 वर्षांचा होतो आणि मी धोनीला पहिल्यांदा पाहात होतो. तो माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता आणि अजूनही आहे. मला अभिमान आहे की माझ्या बॅटवर त्याची स्वाक्षरी आहे.'
('I wanted to fill MS Dhoni's shoes' says Ishan Kishan)
याशिवाय ईशानने सांगितले की त्याच्या आईने त्याला जर्सीसाठी 32 क्रमांक घेण्याचा सल्ला दिला होता. तसेच तो 14 वर्षांचा असताना बिहारमधून झारखंडला आल्यानंतर क्रिकेट गंभीरतेने खेळू लागला. त्यावेळी त्याने ठरवले होते की त्याला भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्याचबरोबर त्याने सांगितले की त्याला जापनिज पदार्थ खायला आवडतात.
24 वर्षीय ईशान सध्या भारतीय संघाबरोबर असून त्याची जागा पक्की करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याने आत्तापर्यंत 13 वनडे आणि 24 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याने वनडेत १ शतक आणि 3 अर्धशतकांसह 507 धावा केल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 4 अर्धशतकांसह 629 धावा केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.