Hyderabad pitch may spin': Rahul Dravid on Hyderabad pitch and England's 'Bazball' approach:
भारत विरुद्ध इंग्लंड संघात 25 जानेवारीपासून 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने खेळपट्टी आणि आक्रमक खेळण्याच्या दृष्टीकोनाबद्दल भाष्य केले आहे.
या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतातील खेळपट्ट्या अपेक्षेप्रमाणे फिरकीला साथ देतील अशी चर्चा आहे. मात्र द्रविडने सांगितले की हैदाराबादमधील खेळपट्टीबद्दल अंदाज बांधणे कठीण आहे.
तो म्हणाला, 'सामना सुरू झाल्यानंतर आपण पाहू आणि अंदाज बांधू. मी जे पाहिले आहे, त्यावरून ही खेळपट्टी चांगली वाटत आहे.'
पण पुढे द्रविड म्हणाला, 'कदाचीत खेळपट्टी थोडी फिरकीला मदत करेल. किती लवकर आणि जलद मदत करेल, याबद्दल मला खात्री नाही. पण कदाचीत या खेळपट्टीवर जसा खेळ पुढे जाईल, तसा चेंडू वळू शकतो.'
गेल्या काही महिन्यांपासून इंग्लंडच्या बझबॉल दृष्टीकोनाबद्दलही बरीच चर्चा होत आहे. त्यामुळे या मालिकेतही इंग्लंड त्याचा वापर करणार का आणि भारतीय संघही त्याप्रमाणे खेळणार का याबद्दलही अनेकांना प्रश्न आहे, त्याबद्दलही द्रविडने प्रतिक्रिया दिली.
खरतंर न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमचे टोपननाव 'बझ' आहे आणि सध्या तो इंग्लंडचा कसोटी प्रशिक्षक आहे. दरम्यान तो प्रशिक्षक झाल्यानंतर इंग्लंडने बऱ्याचदा कसोटीत आक्रमक फलंदाजीचा पवित्रा स्विकारला आहे. त्याचमुळे आक्रमक पद्धतीने खेळण्याला बझबॉल म्हणून ओळख मिळाली आहे.
द्रविड याबद्दल म्हणाला, 'मला वाटत नाही की आम्ही खूप आक्रमक खेळण्याचा प्रयत्न करू. आम्ही आमच्यासमोर जशी परिस्थिती असेल, त्यानुसार खेळण्याचा प्रयत्न करू. पण जर तुम्ही आमचे सुरुवातीचे सहा-सात फलंदाज पाहिले, तर लक्षात येईल ते नैसर्गिकरित्याच आक्रमक आहेत.'
'त्यामुळे ते कोणत्या वेगळ्यापद्धतीने त्यांचा दृष्टीकोन बदलण्याचा विचार करत नाही. अनेक वेगवेगळ्या परिस्थिती उद्भवू शकतात, ज्यात काही वेळा तुम्हाला आक्रमक खेळण्याची गरज भासू शकते, तर काहीवेळा बराच काळ फलंदाजी करावी लागू शकते.'
'परंतु मला वाटत नाही की माझे कोणतेही फलंदाज मागे हटतील किंवा खूप बचावात्मक खेळण्याचा प्रयत्न करतील.'
याशिवाय द्रविडने इंग्लंडच्या आक्रमक दृष्टीकोनाचे कौतुक केले आहे. त्याने म्हटले की त्यापद्धतीने त्यांना आत्तापर्यंत चांगले यश मिळाले आहे. पण भारताविरुद्ध ते कसे खेळतात हे पाहावे लागेल असेही द्रविडने म्हटले.
याशिवाय इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने म्हटले आहे की ज्या खेळपट्ट्या दिल्या जातील, त्यावर इंग्लंड संघाला चांगली कामगिरी करून दाखवावी लागले. तसेच त्याने म्हटले आहे की संघात चांगला आत्मविश्वास असून त्यांच्याकडे चांगले फिरकीपटू, वेगवान गोलंदाज आणि फलंदाज आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.