पणजी ः बार्थोलोम्यू ओगबेचे आणि हावियर सिव्हेरियो यांनी नोंदविलेल्या गोलच्या बळावर हैदराबाद एफसीने बुधवारी केरळा ब्लास्टर्सला 2-1 फरकाने हरविले आणि आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धेत सर्वप्रथम उपांत्य (प्ले-ऑफ) फेरी निश्चित केली. सामना बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर झाला.
ओगबेचे याने 28व्या मिनिटास तर बदली खेळाडू स्पेनच्या सिव्हेरियो याने 87व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. हैदराबादचा हा 18 लढतीतील दहावा विजय ठरला. 35 गुणांसह त्यांचे अग्रस्थान अबाधित राहिले आणि दोन सामने बाकी असताना उपांत्य फेरीतील जागाही पक्की झाली. स्पर्धेत सर्वाधिक 41 गोल नोंदविलेल्या हैदराबादचे आता दुसऱ्या स्थानावरील जमशेदपूर एफसीपेक्षा चार गुण जास्त आहेत.
केरळा (Kerala) ब्लास्टर्सचा हा 17 सामन्यातील चौथा पराभव ठरला. त्यामुळे 27 गुणांसह ते पाचव्या स्थानी कायम राहिले. बदली खेळाडू व्हिन्सी बार्रेटो याने 90+4व्या मिनिटास केरळच्या संघाची पिछाडी एका गोलने कमी केली. व्हिन्सीचा हा पहिलाच आयएसएल गोल ठरला.
ओगबेचे, सिव्हेरियोमुळे आघाडी भक्कम
नायजेरियन आघाडीपटू बार्थोलोम्यू ओगबेचे याने मोसमातील वैयक्तिक 17 वा गोल नोंदवून हैदराबादला अर्ध्या तासाच्या खेळापूर्वी आघाडी मिळवून दिली. गोल्डन बूटच्या शर्यतीत तो आता खूपच पुढे गेला आहे. 37 वर्षीय खेळाडूचा हा 74 आयएसएल सामन्यांतील एकूण 52 वा गोल ठरला. रोहित दानूच्या हेडिंगवर चेंडू मिळाल्यानंतर ओगबेचे याने नियंत्रण राखत, शानदार गिरकी घेत केरळा ब्लास्टर्सच्या बचावपटूस चकवा देत अचूक फटका मारला. सामन्याच्या 79व्या मिनिटास बदली खेळाडू या नात्याने मैदानात उतरलेल्या 24 वर्षीय सिव्हेरियो याने निखिल पुजारीच्या असिस्टवर झेपावत हेडिंग साधले आणि हैदराबादची आघाडी आणखीनच भक्कम केली. त्याचा हा मोसमातील वैयक्तिक सहावा गोल ठरला.
गोलरक्षक प्रभसुखन उल्लेखनीय
केरळा ब्लास्टर्सचा गोलरक्षक प्रभसुखन गिल उल्लेखनीय ठरला. त्यामुळे वारंवार प्रतिहल्ला चढविलेल्या हैदराबादची आक्रमणे या 21 गोलरक्षकाने रोखून धरली. 58व्या मिनिटास त्याने कमाल केली. रोहित दानू याचा फटका रोखताना त्याने उजवीकडे यशस्वी झेप घेतली, क्षणाधार्थ स्वतःला सावरले आणि डावीकडे झेप घेत ओगबेचे याचा रिबाऊंड फटका फोल ठरविला.
केरळा ब्लास्टर्सच्या संधी हुकल्या
केरळा ब्लास्टर्सने हैदराबादला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले, पण त्यांच्या खेळाडूंचे फटके क्रॉसबारला आपटल्यामुळे गोलने त्यांना हुलकावणी दिली आणि हैदराबादची आघाडी अबाधित राहिली. विश्रांतीपूर्वी चेन्को ग्येल्तशेन याचा फटका, तसेच उत्तरार्धात हरमनजोत खब्रा याचा हेडर क्रॉसबारला आपटून दिशाहीन झाला. याशिवाय पन्नासाव्या मिनिटास चेन्को याचा धोकादायक फटका हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याने वेळीच रोखला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.