India vs Australia Hockey: ऑस्ट्रेलिया हॉकी संघ विरुद्ध भारतीय हॉकी संघ यांच्यात 5 सामन्यांची मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेतील अखेरचा सामना रविवारी पार पडला असून या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 5-4 अशा फरकाने विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकाही 4-1 अशा फरकाने जिंकली.
ही मालिका पुढील वर्षी होणाऱ्या हॉकी वर्ल्डकपच्या (Hockey World Cup 2023) दृष्टीने महत्त्वाची होती. दरम्यान या संपूर्ण मालिकेतील 4 सामन्यांत भारताला पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी भारतीय संघाने प्रत्येक सामन्यांत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावरील ऑस्ट्रेलियाला तगडी लढत दिली होती.
दरम्यान, पाचव्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास ऑस्ट्रेलियाकडून (Australia) टॉम विकहॅमने (5’, 17’) दोन गोल केले, तर अरान झालेव्स्की (30’), जेकॉब अँडरसन (40’) आणि जॅक व्हेटन (54’) यांनी प्रत्येकी एक गोल केला. तसेच भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगने (24’, 60’) दोन गोल नोंदवले. तसेच अमित रोहिदास (34’) आणि सुखजीत सिंग (55’) यांनी प्रत्येकी एक गोल केला.
यजमान ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या सुरुवातीलाच आक्रमण केले. सुरुवातीच्या 5 मिनिटातच विकहॅमने पहिला गोल नोंदवला. त्याचा गोल रोखण्यासाठी पीआर श्रीजेशकडे कोणतेही उत्तर नव्हते. पण भारत या धक्क्यातून पटकन सावरला आणि त्यांनीही तगडी लढत देण्यास सुरुवात केली.
भारताला (Indian Hockey Team) तीन सलग पेनल्टी कॉर्नर्सही मिळाले होते. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या तगड्या बचावामुळे हे तिन्ही पेनल्टी कॉर्नर वाया गेले. विकहॅमने दुसऱ्या क्वार्टरमध्येही सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियासाठी गोल नोंदवत आघाडी मिळवून दिली.
पण, भारताचा कर्णधार हरमनप्रीतने ही आघाडी कमी करताना मिळालेला चौथा पेनल्टी कॉर्नर वाया जाऊ दिला नाही. त्याने 24 व्या मिनिटाला भारताचा सामन्यातील पहिला गोल नोंदवला. मात्र, झालेव्स्कीने 30 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियासाठी तिसरा गोल नोंदवला आणि भारत पुन्हा मागे पडला.
हाफ टाईमनंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतानेही हार न मानण्याची वृत्ती दाखवून दिली. 34 व्या मिनिटाला हार्दिक सिंगने अमित रोहिदासकडे पास दिला आणि त्यावर अमितनेही चूक न करता गोल नोंदवला. पुढे अँडसनने ऑस्ट्रेलियाची आघाडी कमी होणार नाही याची काळजी घेत चौथा गोल नोंदवला.
अखेरचा क्वार्टर संपायला 6 मिनिटं बाकी असतानाच व्हेटनने ऑस्ट्रेलियासाठी 5 वा गोल करत आघाडी भक्कम केली. त्यामुळे भारतासाठी पुनरागमन करणे कठीण झाले. मात्र अखेरच्या 5 मिनिटातही भारताने लढावू वृत्ती दाखवत सलग दोन गोल नोंदवले. सुखजीत सिंगने 55 व्या मिनिटाला आणि हरमनप्रीतने अखेरच्या मिनिटाला चौथा गोल नोंदवत गोलफरक कमी केला. मात्र, सामन्याचा वेळ संपल्याने भारताला हा सामना 5-4 अशा फरकाने गमवावा लागला.
सामन्यानंतर भारताचा कर्णधार हरमनप्रीत म्हणाला, ओपन स्पेस सोडणे आणि सातत्यातील कमतरता अशा काही गोष्टी आम्हाला या दौऱ्यातून शिकायला मिळाल्या आहेत. दरम्यान भारताने या 5 सामन्यांच्या मालिकेत 17 गोल नोंदवले, ही महत्त्वाची गोष्ट असल्याचे ग्रॅहम रीड यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.