पणजी : कर्णधार शिखा पांडे व तेजस्विनी दुर्गड यांनी मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना झुंजार शतकी भागीदारी केली, पण अखेरीस त्यांचे प्रयत्न तोकडेच ठरले. हिमाचल प्रदेशने गोव्यावर तीन धावांनी निसटती मात करून सीनियर महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेतील उपउपांत्यपूर्व सामना गुरुवारी सूरत येथील सी. के. पिठवाला मैदानावर झाला. गोव्यासमोर विजयासाठी 168 धावांचे लक्ष्य होते. पहिल्या तिघी 4.3 षटकांत 24 धावांत माघारी परतल्यानंतर शिखाने तेजस्विनीच्या साथीत सामना खेचून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. दोघींनी चौथ्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली, मात्र हिमाचलच्या हरलीन देओल हिने जम बसलेल्या दोघींनाही नऊ चेंडूंच्या फरकाने बाद केल्यामुळे गोव्याला विजय थोडक्यात हुकला.
शिखाचे अर्धशतक
शिखाने 50 चेंडूंत नऊ चौकार व तीन षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या, तर तेजस्विनीने 31 चेंडूंत तीन चौकार व एका षटकाराच्या मदतीने 40 धावा केल्या. त्यांनी 76 चेंडूंत 110 धावांची भागीदारी केली. 17 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर तेजस्विनी बाद झाली. नंतर गोव्याला विजयासाठी 10 चेंडूंत 17 धावा हव्या असताना शिखा झेलबाद झाली आणि सामना गोव्याच्या हातून निसटला. शेवटच्या षटकात 12 धावा करण्याचे आव्हान गोव्याच्या तळाच्या फलंदाजांना जमले नाही. गोव्याचा डाव 7 बाद 164 धावांवर रोखला गेला.
हरलीनची फटकेबाजी
त्यापूर्वी, हरलीन देओल हिने फटकेबाजी केल्यामुळे हिमाचल प्रदेशला प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 167 धावा करता आल्या. हरलीनने 66 चेंडूंत 10 चौकार व दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 84 धावा केल्या. तिने निकिता चौहान (43) हिच्यासमेवत हिमाचलला 90 धावांची सलामी दिली, नंतर एस. एम. सिंग हिच्यासह दुसऱ्या विकेटसाठी 44 धावांची, तर कर्णधार सुषमा वर्मा हिच्यासह तिसऱ्या विकेटसाठी 12 चेंडूंत 33 धावांची अभेद्य भागीदारी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.