भारतात सध्या रणजी ट्रॉफी 2023-24 हंगाम सुरू असून हा हंगाम अखेरच्या टप्प्यात आहे. त्यातच आता एक खळबळजनक घटने समोर आली आहे. आंध्र प्रदेशचा माजी कर्णधार हनुमा विहारीने राज्य संघटनेवर काही आरोप करण्याबरोबरच राजकीय हस्तक्षेपामुळे त्याला नेतृत्व सोडवे लागल्याचा दावा केला आहे.
आंध्र प्रदेशला सोमवारी उपांत्यपूर्व फेरीत मध्य प्रदेशविरुद्ध अवघ्या 4 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात विहारीने 55 धावांची झुंजार खेळी केली. पण त्याला अन्य कोणाची फारशी साथ न मिळाल्याने संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले.
दरम्यान, या पराभवानंतर विहारीने इंस्टाग्रावर मोठी पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने अनेक खळबळजनक दावे केले आहेत.
जानेवारीमध्ये विहारीने आंध्र प्रदेश आणि बंगाल संघात झालेल्या सामन्यानंतर कर्णधारपद सोडले होते. त्यावेळी त्याने वैयक्तिक कारण असल्याचे सांगितले होते. पण आता त्याने स्पष्ट केले आहे की राजकीय हस्तक्षेपामुळे त्याला हे पाऊल उचलावे लागले.
विहारीने लिहिले आहे की 'मी बंगालविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कर्णधार होतो. त्या सामन्यादरम्यान मी 17 व्या खेळाडूवर ओरडलो. त्यानंतर त्याने त्याच्या वडिलांकडे (जे राजकारणात आहेत) तक्रार केली. त्यानंतर त्याच्या वडिलांनी असोसिएशनला माझ्याविरुद्ध कारवाई करण्यास सांगितले.'
'जरी आम्ही गेल्यावर्षीचे फायनलिस्ट असलेल्या बंगालच्या 410 धावांचा पाठलाग केला असला, तरी मला कोणत्याही चूकीशिवाय कर्णधारपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले.'
'मी त्या खेळाडूला वैयक्तिक काहीही म्हटलो नव्हतो. पण असोसिएशनला तो खेळाडू माझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचा वाटला. मी गेल्यावर्षीही माझे सर्वस्व दिले आणि डाव्या हातानेही फलंदाजी केली (हाताला फ्रॅक्चर झाल्याने विहारीने डाव्या हाताने फलंदाजी केली होती).'
'शेवटच्या 7 हंगामांपैकी 5 वेळा आंध्रप्रदेशला बाद फेरीपर्यंत नेले आहे आणि भारतासाठी १६ कसोटी सामनेही खेळले आहेत.'
विहारीने पुढे लिहिले, 'मला खूप वाईट वाटले, पण मी या खेळाचा आणि माझ्या संघाचा आदर ठेवतो, त्यामुळे मी या हंगामात खेळणे कायम केले. सर्वात वाईट गोष्ट ही की असोसिएशनला वाटते की ते सांगतील, ते खेळाडूंनी ऐकायला हवे. त्यांच्यामुळे खेळाडू आहेत.
'मला खूप अपमानित आणि लाजिरवाणे वाटले, पण मी आत्तापर्यंत कधीही व्यक्त झालो नव्हतो. मी निर्णय घेतला आहे की मी पुन्हा आंध्र प्रदेशसाठी खेळणार नाही. मी माझा आत्मसन्मान तिथे गमावला आहे. माझे संघावर प्रेम आहे. प्रत्येक हंगामात आम्ही जशी प्रगती करत होतो, ते शानदार होते. पण असोसिएशनला आमची प्रगती नको आहे.'
दरम्यान, या पोस्टनंतर आणखी एक पोस्ट विहारीने शेअर केली आहे, ज्यात आंध्र प्रदेशच्या संघातील काही खेळाडूंनी स्वाक्षरी करून राज्य संघटनेला पत्र लिहिले आहे की त्यांना यापुढे विहारीच कर्णधार म्हणून हवा आहे.
तसेच या पत्रात असाही खुलासा केला आहे की विहारी जेव्हा त्या खेळाडूला बोलला होता, तेव्हा त्याने असे कोणतेही भाष्य केले नव्हते, ज्यामुळे वाद होईल, जे शब्द वर्षानुवर्ष ड्रेसिंग रुममध्ये वापरले जातात, तेच शब्द त्याने वापरले होते. या पत्रात सध्या विहारीनंतर आंध्र प्रदेशचे नेतृत्व केलेल्या रिकी भूईनेही स्वाक्षरी केली आहे.
विहारीने रणजी ट्रॉफी 2023-24 हंगामात 13 डावात 522 धावा केल्या होत्या. तो रिकी भूईनंतर (902 धावा) या हंगामात सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे.