South Zone won BCCI Duleep Trophy 2023: रविवारी दुलीप ट्रॉफी 2023 स्पर्धेचे विजेतेपद हनुमा विहारीच्या नेतृत्वातील दक्षिण विभागाने (South Zone) उंचावले. बंगळुरूला झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण विभागाने पश्चिम विभागाविरुग्ध (West Zone) 75 धावांनी विजय मिळवत हे विजेतेपद जिंकले.
या सामन्यात अखेरच्या दिवशी पश्चिम विभागाला 116 धावांची गरज होती, तर दक्षिण विभागाला 5 विकेट्सची गरज होती. तसेच चौथ्या दिवसाखेर पश्चिम विभागाचा कर्णधार प्रियांक पांचाल 92 धावांवर नाबाद होता. पण त्याला पाचव्या दिवशी खास काही करता आले नाही आणि तो 95 धावांवर विद्वथ कविरप्पाची गोलंदाजी खेळताना यष्टीरक्षक रिकी भूईकडे झेल देत बाद झाला.
त्यानंतर मात्र, पश्चिम विभागाची तळातील फलंदाजी तग फार काळ तग धरू शकली नाही. अखेरचे तिन्ही विकेट्स आर साई किशोरने घेतले आणि 298 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असलेल्या पश्चिम विभागाचा दुसरा डाव 84.2 षटकात 222 धावांवर संपुष्टात आला.
या डावात पश्चिम विभागाकडून पांचालव्यतिरिक्त सर्फराज खानने 48 धावांची खेळी केली. बाकी कोणालाही 20 धावांचाही टप्पा पार करता आला नाही. दक्षिण विभागाकडून वासुकी कौशिक आणि साई किशोर यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतले. तसेच विद्वथ कविरप्पा आणि विजयकुमार वैशाख यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पुर्वी, या सामन्यात पश्चिम विभागाने या सामन्यान नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दक्षिण विभाग प्रथम फलंदाजीसाठी उतरला. दक्षिण विभागाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 78.4 षटकात सर्वबाद 213 धावा केल्या. या डावात दक्षिण विभागाकडून कर्णधार हनुमा विहारीने सर्वाधिक 63 धावांची खेळी केली. तसेच तिलक वर्माने 40 धावांची खेळी केली.
गोलंदाजी करताना पश्चिम विभागाकडून शम्स मुलानीने 3 विकेट्स घेतल्या. तसेच अर्झन नागवासवाला, चिंतन गजा आणि धर्मेंद्रसिंग जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर अतित शेठने 1 विकेट घेतली.
त्यानंतर पश्चिम विभागाचा पहिला डाव 51 षटकातच केवळ 146 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे दक्षिण विभागाने 67 धावांची आघाडी घेतली. या डावात पश्चिम विभागाकडून पृथ्वी शॉ याने सर्वाधिक 65 धावांची खेळी केली. तसेच हार्विक देसाईने 21 धावांची खेळी केली केली. या दोघांव्यतिरिक्त कोणाही 15 धावांचा टप्पाही ओलांडला नाही.
दक्षिण विभागाकडून या डावात विद्वथ कविरप्पाने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर विजयकुमार वैशाखने 2 विकेट्स घेतल्या, तर वासुकी कौशिकने 1 विकेट घेतली.
दक्षिण विभागाने दुसऱ्या डावात 81.1 षटकात सर्वबाद 230 धावा केल्या आणि 67 धावांच्या आघाडीमुळे पश्चिम विभागासमोर 298 धावांचे आव्हान ठेवले. दुसऱ्या डावाच दक्षिण विभागाकडून हनुमा विहारीनेच सर्वाधिक 42 धावांची खेळी केली.
तसेच रिकी भूई (37), वॉशिंग्टन सुंदर (37) आणि मयंक अगरवाल (35) यांनी छोटेखानी खेळी केल्या. पश्चिम विभागाकडून गोलंदाजीत धर्मेंद्रसिंग जडेजाने 5 विकेट्स घेतल्या. अर्झन नागवासवाला आणि अतित शेठ यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. चिंतन गजाने 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.