IPL 2023 Playoff equations: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत सोमवारी गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध 34 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे गुजरातने आता प्लेऑफमध्ये प्रवेश तर मिळवलाच आहे, पण 18 गुणांसह गुणतालिकेतील पहिल्या दोन क्रमांकावरील स्थानही निश्चित केले आहे.
मात्र, या पराभवानंतर सनरायझर्स हैदराबादचे आव्हान अधिकृतरित्या संपले आहे. त्याआधीच दिल्ली कॅपिटल्सचेही आव्हान संपले आहे. त्यामुळे आता गुणतालिकेकडे पाहिले, तर गुजरातने आयपीएल 2023 प्लेऑफमध्ये स्थान पक्के केल्याने तीनच जागा उरल्या आहेत. तसेच दिल्ली आणि हैदराबाद संघांचे आव्हान संपल्याने प्लेऑफमधील उर्वरित तीन जागांसाठी तब्बल सात संघात चूरस आहे.
हे सात संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, लखनऊ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स. आता या संघांपैकी मुंबई, लखनऊ, बेंगलोर आणि पंजाब यांचे अद्याप दोन साखळी सामने बाकी आहे, तर चेन्नई, राजस्थान आणि कोलकाता यांचे अद्याप केवळ एक सामनाच बाकी आहे.
त्यामुळे प्लेऑफसाठीचे या सात संघांसाठी कसे समीकरण असणार आहे, याचा आढावा घेऊ.
एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स सध्या गुणतालिकेत गुजरात पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहेत. चेन्नईने आत्तापर्यंत 12 सामन्यांमध्ये 7 विजय मिळवले आहे आणि 5 पराभव स्विकारले आहेत. तसेच 1 सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे सध्या त्यांचे 15 गुण आहेत.
चेन्नई प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहे, मात्र असे असले तरी चेन्नईचे प्लेऑफमधील स्थान पक्के झालेले नाही. आता चेन्नईला अखेरचा साखळी सामना 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळायचा आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवल्यास चेन्नई प्लेऑफमधील स्थान सहज पक्के करेल.
तसेच त्यांना दुसऱ्या क्रमांकावर कब्जा करण्याचीही संधी असेल. पण दुसरे स्थान पक्के करायचे असेल, तर चेन्नईला दिल्लीविरुद्धचा सामना, तर जिंकावा लागेलच पण अशीही आशा करावी लागेल की मुंबई त्यांचा किमान एक सामना पराभूत होईल आणि लखनऊनेही दोन्ही सामने जिंकले, तरी त्यांना नेटरनरेट कमी राहिल.
मात्र, जर दिल्ली विरुद्धच्या सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला, तर मात्र चेन्नईला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यांना आशा करावी लागेल की अन्य 6 संघांनी 14 गुणांच्या वर पोहचू नये.
रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे, जो गुजरातच्या 18 गुणांची बरोबरी करू शकतो. मुंबई सध्या आयपीएल 2023 स्पर्धेच्या गुणतालिकेत 12 सामने खेळल्यानंतर 14 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मुंबईने 7 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने पराभूत झाले आहेत.
त्यामुळे मुंबईने जर उर्वरित दोन्ही साखळी सामन्यात विजय मिळवल्यास ते गुणतालिकेत 18 गुणांसह पहिल्या दोन क्रमांकावरील स्थान निश्चित करतील. पण मुंबईला त्यासाठी त्यांचे उर्वरित लखनऊ आणि हैदाराबादविरुद्धचे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.
तसेच जर त्यांना दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवता आला, तर मात्र त्यांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी अन्य ६ संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. तसेच जर मुंबई उर्वरित दोन्ही सामने पराभूत झाले, तर मात्र त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते.
जर मुंबईने दोन्ही सामने पराभूत झाले, तर त्यांना अपेक्षा असेल की रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यातील कोणत्यात संघाने 14 गुणांपर्यंत पोहचू नये किंवा जर कोणाचे 14 गुण झालेच, तर त्यांचा नेट रनरेट मुंबईपेक्षा जास्त नसावा.
सध्या कृणाल पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सने आत्तापर्यंत 12 सामन्यांमध्ये 6 विजय मिळवले आहे आणि 5 पराभव स्विकारले आहेत. तसेच एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे त्यांचे 13 गुण आहेत. त्यामुळे लखनऊ सध्या चौथ्या क्रमांकावर आहेत.
त्यांना आता उर्वरित दोन साखळी सामने मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळायचा आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये थेट प्रवेशासाठी लखनऊला दोन्ही सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. असे झाल्यास ते 17 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावरही पोहचू शकतात.
पण दुसरे स्थान पक्के करायचे असेल, तर लखनऊला दोन्ही सामन्यातील विजयाबरोबरच अशीही आशा करावी लागेल की चेन्नईने त्यांचे अखेरचा सामना पराभूत व्हावा किंवा जिंकला तरी त्यांचा नेटरनरेट कमी राहावा.
तसेच जर लखनऊने उर्वरित दोन सामन्यांपैकी एक सामना पराभूत झाला, तर त्यांना उर्वरित 6 संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. त्यांना आशा करावी लागेल की चेन्नईव्यतिरिक्त अन्य 5 संघांनी 14 गुणांच्या वर पोहचू नये. तसेच जर लखनऊने दोन्ही सामने पराभूत झाले, तर मात्र त्यांचे आव्हान संपुष्टात येण्याचीच शक्यता दाट आहे.
फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सध्या गुणतालिकेत 12 गुणांसह ५ व्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 12 सामन्यांमध्ये 6 सामने जिंकले आहे, तर 6 सामने पराभूत झाले आहेत. त्यांचे अद्याप सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स संघाविरुद्ध सामने बाकी आहेत.
बेंगलोरला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे. पण त्यासाठी त्यांना उर्वरित ६ संघांकडून कडवी टक्कर मिळणार आहे. प्लेऑफमधील जागा पक्की करण्यासाठी बेंगलोरला उर्वरित दोन्ही सामने जिंकावेच लागणार आहे, तसेच अन्य संघ 16 गुणांपर्यंत पोहचणार नाही अशी अपेक्षा करावी लागेल किंवा जरी पोहोचले, तरी त्यांचा नेट रनरेट कमी रहावा अशी अपेक्षा करावी लागेल.
तसेच जर एक जरी सामना पराभूत झाला, तर मात्र त्यांना अन्य संघांनी 14 गुणांपर्यंत पोहचू नये अशी आशा करण्याबरोबरच स्वत:चा नेट रनरेटही चांगला ठेवावा लागणार आहे. मात्र, जर बेंगलोरने उर्वरित दोन्ही सामने पराभूत झाले, तर मात्र त्यांचे आव्हान अधिकृतरित्या संपुष्टात येईल.
संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्ससाठी ही स्पर्धा संमिश्र स्वरुपाची राहिली आहे. दरम्यान सध्या राजस्थानने आत्तापर्यंत 13 सामन्यांमध्ये 6 सामने जिंकले असून 7 सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांचे 12 गुण आहेत आणि ते जास्तीत जास्त आता 14 गुणांपर्यंतच पोहचू शकतात. त्यामुळे आता त्यांना कितीही झाले तरी अन्य संघांच्या निकालावरच अवलंबून राहावे लागणार आहे.
राजस्थानचा अखेरचा साखळी सामना पंजाब किंग्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यात राजस्थानला विजयाचीच अपेक्षा असेल, असे न झाल्यास राजस्थानचे आव्हान संपुष्टात येईल.
जर राजस्थानने विजय मिळवला, तर त्यांना अपेक्षा असेल की लखनऊने दोन्ही सामने पराभूत व्हावे आणि अन्य संघांनीही 14 गुणांपर्यंत पोहचू नये किंवा जरी पोहचले, तरी त्यांच्यापेक्षा कमी नेट रनरेट असावा. जर लखनऊने एक जरी सामना जिंकला, तरी राजस्थानला नेट रन रेटवर अवलंबून राहावे लागणार आहे.
नितीश राणाच्या नेतृत्वातील कोलकाताने यावर्षी काही अविश्वसनीय विजय मिळवले आहेत. सध्या कोलकाता गुणतालिकेत 7 व्या क्रमांकावर असून त्यांनी आत्तापर्यंत 13 सामन्यांमध्ये 6 सामने जिंकले असून 7 सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांचे 12 गुण आहेत आणि ते जास्तीत जास्त आता 14 गुणांपर्यंतच पोहचू शकतात.
त्यांच्यासमोरही राजस्थानप्रमाणेच समीकरण असून त्यांचा अखेरचा सामनाच लखनऊविरुद्ध होणार आहे. त्यामुळे त्यांना या सामन्यात विजयाचीच गरज आहे. तसे न झाल्यास त्यांचे आव्हान संपुष्टात येईल.
तसेच जर कोलकाताने हा सामना जिंकला, तर त्यांना अपेक्षा असेल की लखनऊने मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव स्विकारलेला असावा. त्याचबरोबर अन्य संघांनीही 14 गुणांपर्यंत पोहचू नये किंवा जरी पोहचले, तरी त्यांच्यापेक्षा कमी नेट रनरेट असावा. त्याचबरोबर लखनऊने जर मुंबईविरुद्धचा सामना जिंकला असेल, तर कोलकाताला नेट रन रेटवर अवलंबून राहावे लागणार आहे.
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्सने आत्तापर्यंत 12 सामन्यांमध्ये 6 सामने जिंकले आहे, तर 6 सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे ते 12 गुणांसह 8 व्या क्रमांकावर आहेत. त्यांनाही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे, पण त्यांना त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. पंजाबचे उर्वरित दोन सामने दिल्ली आणि राजस्थान विरुद्ध होणार आहेत.
जर पंजाबने हे दोन्ही सामने जिंकले, तरी त्यांना अन्य 6 संघ 16 गुणांपर्यंत पोहचणार नाही अशी अपेक्षा करावी लागेल किंवा जरी पोहोचले, तरी त्यांचा नेट रनरेट कमी रहावा अशी अपेक्षा करावी लागेल.
तसेच जर पंजाब एक जरी सामना पराभूत झाला, तर मात्र त्यांना अन्य संघांनी 14 गुणांपर्यंत पोहचू नये अशी आशा करण्याबरोबरच स्वत:चा नेट रनरेटही चांगला ठेवावा लागणार आहे. त्याशिवाय जर पंजाबने उर्वरित दोन्ही सामने पराभूत झाले, तर मात्र त्यांचे आव्हान अधिकृतरित्या संपुष्टात येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.