IPL 2023 Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सोमवारी (15 मे) 62 वा सामना खेळवला गेला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने 34 धावांनी विजय मिळवला.
या विजयासह गुजरातचे या हंगामाच्या प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. त्यामुळे आयपीएल 2023 प्लेऑफमध्ये पोहोचणारा गुजरात पहिला संघ ठरला आहे. मात्र, सनरायझर्स हैदराबादचे या हंगामातील आव्हान संपुष्टात आले आहे.
या सामन्यात गुजरातने शुभमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर हैदराबादसमोर 189 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला 20 षटकात 9 बाद 154 धावा करता आल्या.
या सामन्यात गुजरातने दिलेल्या 189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. त्यांनी पॉवरप्लेच्या पहिल्या 6 षटकातच अनमोलप्रीत सिंग (5), अभिषेक शर्मा (4), राहुल त्रिपाठी (1) आणि कर्णधार एडन मार्करम (10) यांच्या विकेट्स 29 धावांतच गमावल्या. यातील तीन विकेट्स तर मोहम्मद शमीनेच घेतल्या.
त्यानंतरही मधली फळीला मोहित शर्माने टिकू दिले नाही. त्यामुळे सनवीर सिंग (7), अब्दुल सामद (4) आणि मार्को यान्सिन (3) यांच्या विकेट्सही झटपट गेल्या. पण त्यानंतर एका बाजू सांभाळणाऱ्या हेन्रिक क्लासेनला भुवनेश्वर कुमारने साथ दिली. या दोघांनी 8 व्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली.
पण ही भागीदारीही शमीनेच तोडली. त्याने अर्धशतक केलेल्या क्लासेनला बाद केले. क्लासेनने 44 चेंडूत 64 धावांची खेळी केली. यानंतर भुवनेश्वर कुमारही 26 चेंडूत 27 धावा करून मोहित शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यामुळे हैदराबादला 154 धावांपर्यंतच पोहचता आले.
गुजरातकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. तसेच यश दयालने 1 विकेट घेतली.
तत्पुर्वी, या सामन्यात हैदराबाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी बोलावलेल्या गुजरातकडून सलामीला वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल उतरले होते. पण साहाला पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने शुन्यावर माघारी धाडले.
पण त्यानंतर गिल आणि साई सुदर्शन यांची जोडी जमली. या दोघांनीही तब्बल 147 धावांची भागीदारी केली. पण अर्धशतकासाठी 3 धावा हव्या असतानाच 15 व्या षटकात मार्को यान्सिनने साई सुदर्शनला 47 धावांवर बाद केले.
यानंतर मात्र गुजरातचा डाव गडगडला. हार्दिक पंड्या (8), डेव्हिड मिलर (7), राहुल तेवातिया (3) यांच्या विकेट्स झटपट गेल्या. दरम्यान, गिलने त्याचे पहिले शतक पूर्ण केले. पण शतकानंतर तोही 20 व्या षटकात बाद झाला. त्याला भुवनेश्वर कुमारनेच बाद केले. गिलने 13 चौकार आणि 1 षटकारासह 58 चेंडूत 101 धावांची खेळी केली.
त्याच्यापाठोपाठ पुढच्याच चेंडूवर राशीद खानलाही भुवनेश्वरने शुन्यावर बाद केले. तर पुढच्या चेंडूवर नूर अहमद धावबाद झाला. त्यामुळे भुवनेश्वरची नाही, पण हैदराबाद संघाची हॅट्रिक झाली. दरम्यान, याच षटकात पाचव्या चेंडूवर मोहम्मद शमीही शुन्यावर झेलबाद झाला. त्यामुळे गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 188 धावा केल्या.
भुवनेश्वर कुमारने शानदार गोलंदाजी करताना 4 षटकात 30 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. तसेच मार्को यान्सिन, फझलहक फारुकी आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.