Volleyball: गोव्याच्या रामा-नितीन जोडीला काव्हा बीच व्हॉलिबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय सुवर्ण

एशियाडमध्ये खेळण्याची संधी हुकली, मात्र योग्यता सिद्ध
Goa Players Win central Asia gold in CAVA Beach Volleyball Tour
Goa Players Win central Asia gold in CAVA Beach Volleyball TourDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Players Win Central Asia Gold In CAVA Beach Volleyball Tour: गोव्याच्या रामा धावसकर व नितीन सावंत जोडीने बांगलादेशमधील कॉक्स बझार समुद्रकिनारी भन्नाट खेळ करत आणखी एक आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त केले.

काही दिवसांपूर्वी भारताच्या या ‘अ’ संघाने आशियाई व्हॉलिबॉल महासंघाच्या (एव्हीसी) बीच व्हॉलिबॉल काँटिनेंटल कप स्पर्धेत रौप्यपदक जिंकून पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पात्रता मिळविली होती.

जोशपूर्ण खेळ कायम राखताना गोमंतकीय जोडीने शुक्रवारी मध्य आशियाई व्हॉलिबॉल संघटनेची (काव्हा) आंतरराष्ट्रीय बीच व्हॉलिबॉल स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम साधला.

कॉक्स बझार समुद्रकिनारी शुक्रवारी झालेल्या पुरुष अंतिम लढतीत रामा व नितीन जोडीने मालदीवच्या जोडीला २-० फरकाने पराजित केले.

गेल्या जूनमध्ये रामा व नितीन जोडीने चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता मिळविली होती, परंतु आंतरराष्ट्रीय अननुभव आणि आशियाई मानांकन नसल्याच्या कारणास्तव केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने रामा व नितीन यांच्या एशियाड संघातील समावेशाला नकार दिला.

त्यानंतर गोव्याच्या या अव्वल व्हॉलिबॉलपटूंनी लागोपाठ दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांची अंतिम फेरी गाठत अनुक्रमे रौप्य व सुवर्णपदकाची कमाई केली व मानांकन नसले तरी एशियाडसाठीची पात्रता योग्य असल्याचे सिद्ध केले.

उपांत्य लढतीत रामा व नितीन जोडीने स्पर्धेतील भारताची ‘ब’ जोडी तमिळनाडूचे रॉबिन रवी व बराथ सोमू जोडीवर मात केली होती. महिला गटात भारताच्या जननी व पवित्रा जोडीला रौप्यपदक मिळाले.

Goa Players Win central Asia gold in CAVA Beach Volleyball Tour
Banastarim Accident Case: ‘चालक कोण’चा गुंता अखेर असा सुटला !

पराभवाचा घेतला बदला

गोमंतकीय व्हॉलिबॉलमध्ये ‘पप्पू’ या टोपणनावाने लोकप्रिय असलेल्या रामा याने कॉक्स बझार येथून सांगितले, की ‘‘शुक्रवारी आम्ही नमवलेली मालदीवची जोडी अनुभवी आहे. ते आता चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेतील.

आम्ही रविवारी मायदेशी परतणार आहोत. स्पर्धेच्या साखळी फेरीत मालदीवच्या जोडीने आमचा धुव्वा उडविला होता, मात्र त्यानंतर प्रशिक्षक प्रल्हाद धावसकर यांनी अंतिम लढतीसाठी छान नियोजन केले.

प्रतिस्पर्धी जोडी जास्त आक्रमक खेळत असल्याने आम्ही ब्लॉकिंग व बचावावर जास्त लक्ष केंद्रित केले. आमच्या बदललेल्या पवित्र्यामुळे प्रतिस्पर्धी सूर गमावून बसले. पहिला सेट आम्ही २१-१९ असा जिंकला, नंतर पिछाडीवरून त्यांना १४-१४ असे गाठले आणि नंतर मागे वळून पाहिलेच नाही. २-० फरकाने सामना जिंकत आम्ही सुवर्णपदक जिंकले.’’

डावी-उजवी जोडी परिणामकारक

क्रीडा व युवा खात्याचा व्हॉलिबॉल प्रशिक्षक असलेला रामा ३३ वर्षांचा असून उजव्या हाताने खेळतो, तर गोवा पोलिस दलातील नितीन २९ वर्षीय असून तो डावखुरा व्हॉलिबॉलपटू आहे.

‘‘आशियाई क्रीडा पात्रता स्पर्धेपासून मी आणि नितीन एकत्रित खेळत आहोत. आमची डावी-उजवी जोडी प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. सध्या आमच्यात सुरेख समन्वय साधला गेला असून पॅरिस ऑलिंपिक पात्रतेच्या दुसऱ्या टप्प्यात खेळण्यासाठी आता आमचे पुढील नियोजन आहे. गोव्यात होणारी ३७वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाही आमच्यासाठी महत्त्वाची आहे,’’ असे रामा म्हणाला.

धावसकरचे दुसरे आंतरराष्ट्रीय सुवर्ण

काव्हा आंतरराष्ट्रीय बीच व्हॉलिबॉल स्पर्धेत जिंकलेले विजेतेपद रामा याच्या कारकिर्दीतील दुसरे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आहे.

२०१४ साली गोव्यात लुसोफोनिया क्रीडा स्पर्धा झाली होती. तेव्हा भारत-गोवा व्हॉलिबॉल संघ रामा याच्या नेतृत्वाखाली खेळला होता व त्यावेळी यजमानांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.

मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान

रामा धावसकर याने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरूनही संधी न मिळाल्याची खंत व्यक्त केली, पण घेतलेल्या मेहनतीचे चीज झाल्याची भावनाही त्याने व्यक्त केली.

तो म्हणाला, ‘‘आशियाई क्रीडा स्पर्धा नजरेसमोर ठेवून मी व नितीनने प्रल्हाद यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मेहनत घेतली. चीनमध्ये जाण्याची संधी मिळाली नाही, पण ते परिश्रम बांगलादेशातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सार्थकी लागल्याचे समाधान आहे."

"बांगलादेशमधील स्पर्धेसाठी भारतीय व्हॉलिबॉल महासंघाच्या अस्थायी समितीने आमची निवड केली होती. स्पर्धेसाठी अंशतः खर्च आम्हाला उचलावा लागला. तो नंतर मिळेलही, पण आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकाचे मोल फार मोठे आहे.’’ काव्हा बीच व्हॉलिबॉल स्पर्धा जिंकल्यामुळे रामा व नितीन जोडीला पाचशे डॉलर्स बक्षिसादाखल मिळाले.

Goa Players Win central Asia gold in CAVA Beach Volleyball Tour
Goa News: खनिज हाताळणी धोरण जाहीर; सरकारने बदलली भूमिका

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com