पणजी: गोव्याच्या (Goa) बॅडमिंटनपटूंनी अखिल भारतीय मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत (All India Masters Badminton Tournament) पहिल्या दिवशी चमकदार विजयाची नोंद करत आगेकूच राखली. स्पर्धेला रविवारी नावेली येथील मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) इनडोअर स्टेडियममध्ये सुरवात झाली. गोवा बॅडमिंटन असोसिएशनतर्फे भारतीय बॅडमिंटन असोसिएशनच्या सहकार्याने स्पर्धा घेण्यात येत आहे. कोविड-19 (Covid-19) मार्गदर्शक शिष्टाचार पाळून स्पर्धा सुरू आहे.
पुरुषांच्या 55 वर्षांवरील वयोगटातील एकेरीत गोव्याच्या फिलिप बार्बोझा याने महाराष्ट्राच्या मिलिंद देशमुख याच्यावर 21-12, 17-21, 21-7 असा विजय नोंदवून उउपांत्यपूर्व फेरी गाठली. फिलिप हा 2018 सालचा राष्ट्रीय व्हेटरन्स स्पर्धेतील ब्राँझपदक विजेता आहे. पुरुषांच्या 60 वर्षांवरील वयोगटातील दुहेरीत कॅन्सियो मस्कारेन्हास व पीटर तेलिस यांनी राऊंड ऑफ 16 फेरी गाठताना उत्तराखंडच्या मोहन मार्तोलिया व नवीन चंद्रा जोडीस 21-5, 21-13 असे हरविले.
पुरुषांच्या 65 वर्षांवरील वयोगटातील एकेरीत गोव्याच्या तानाजी सावंत याने चमकदार विजयाची नोंद केली. त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत हरियानाच्या रवींद्रनाथ कालरा याच्यावर 21-6, 21-5 अशी आरामात विजय नोंदविला. याच वयोगटातील दुहेरीत तानाजी सावंत व प्रदीप धोंड जोडीने द्वितीय मानांकित जोडीस धक्का दिला. त्यांनी अशोक कुमार व अनिलकुमार सोंधी जोडीस 23-21, 21-18 असे नमवून उपउपांत्यपूर्व फेरीत जागा मिळविली.
जागतिक स्पर्धेसाठी निवड चाचणी
अखिल भारतीय मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये स्पेनमध्ये होणाऱ्या बीडब्ल्यूएफ जागतिक सीनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड चाचणी आहे. त्यामुळे गोव्यात होणाऱ्या स्पर्धेत महत्त्व प्राप्त झाले आहे. विविध वयोगटात होणाऱ्या या आठ दिवसीय स्पर्धेसाठी एक हजाराहून जास्त प्रवेशिकांची नोंद झाली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.