पणजी: गोव्याचे युवा फुटबॉल प्रशिक्षक फ्रान्सिस ब्रुतो दा कॉस्ता (Goa youth football coach Francisco Bruto da Costa) आता इजिप्तमध्ये (Egypt) योगदान देणार असून ते त्या देशाच्या राष्ट्रीय फुटबॉल महासंघाची (National Football Federation) जबाबदारी पेलणार आहेत. इजिप्त फुटबॉल (Egypt Football) महासंघाने पोर्तुगीज नेलो व्हिंगाडा यांची तांत्रिक संचालकपदी नियुक्ती केली आहे. फ्रान्सिस ब्रुतो दा कॉस्ता त्यांचे सहाय्यक असतील. कार्लोस क्वेरोज हे इजिप्त राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. प्राप्त माहितीनुसार, येत्या आठवड्यात ते इजिप्त फुटबॉलमध्ये रुजू होतील.
सध्या फ्रान्सिस बांगलादेश प्रीमियर लीगमधील शेख रसेल केसी क्लबचे सहाय्यक-तंदुरुस्ती प्रशिक्षक आहेत. गतमोसमातील आयएसएल स्पर्धेसाठी ईस्ट बंगालने रॉबी फॉलर यांची नियुक्ती करण्यापूर्वी फ्रान्सिस कोलकात्यातील ईस्ट बंगाल संघाचे प्रशिक्षक होते.
फ्रान्सिस मडगाव येथील असून 39 वर्षांचे आहेत. वयाच्या विसाव्या वर्षी सालसेत एफसी संघाचे प्रशिक्षकपद सांभाळल्यानंतर, त्यांनी 2004 पासून 2016 पर्यंत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या एलिट अकादमीत 14, 17, 19 वर्षांखालील वयोगट संघाचे प्रशिक्षक या नात्याने जबाबदारी पेलली आहे. त्यापूर्वी ते साळगावकर एफसीच्या युवा विकास कार्यक्रमाचे प्रमुख होते.
इंडियन सुपर लीग (ISL) स्पर्धेत 2016 साली त्यांनी गुवाहाटीच्या नॉर्थईस्ट युनायटेड संघाचे सहाय्यक प्रशिक्षक या नात्यानेही काम पाहिले होते. तेव्हा पोर्तुगालचे नेलो व्हिंगाडा त्या संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. नंतर व्हिंगाडा 2017 मध्ये मलेशियाच्या राष्ट्रीय संघाचे, तसेच 2019 मध्ये व्हिंगाडा आयएसएलमधील केरळा ब्लास्टर्सचे प्रशिक्षक असताना फ्रान्सिस त्यांचे सहाय्यक होते. 2008 साली गोव्याच्या या फुटबॉल मार्गदर्शकाने प्रशिक्षणात एएफसी अ परवाना मिळविला. ते एएफसी प्रो-लायसन्सधारक प्रशिक्षकही आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.