कर्णधार दर्शन मिसाळ (5-70) याची जादुई फिरकी व पुनरागमन करणारा मध्यमगती विजेश प्रभुदेसाई (4-57) याच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर गोव्याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सेनादलावर डाव व 04 धावांनी विजय नोंदवत बोनस गुणाची कमाई केली.
हा सामना पालम-नवी दिल्ली येथील एअरफोर्स मैदानावर झाला. गोव्याने पहिल्या डावात 308 धावांची आघाडी घेतली होती. शुक्रवारी सामन्याच्या शेवटच्या दिवशी उपाहारानंतर सेनादलाचा दुसरा डाव 304 धावांत संपुष्टात आला. गोव्याच्या पहिल्या डावात नाबाद दीडशतक (156) केलेला एकनाथ केरकर सामन्याचा मानकरी ठरला.
सेनादलाचा सलामीवीर रवी चौहान (139) याने शतक केले. सेनादलाच्या अर्पित गुलेरिया (10) व दिवेश पठाणिया (नाबाद 20) यांनी शेवटच्या विकेटसाठी 30 धावांची भागीदारी केली, पण ते डावाचा पराभव टाळू शकले नाही. विजेशने अर्पितला बाद करून गोव्याच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सेनादलाने तिसऱ्या दिवसअखेर 2 बाद 139 धावा केल्या होत्या. शुक्रवारी उपाहारानंतर त्यांनी 3 धावांत 4 विकेट गमावल्या.
गोव्याने यंदा केरळला 7 विकेट राखून हरविले होते. त्यानंतर मागील लढतीत पुदुचेरीविरुद्ध 9 विकेटने पराभूत झाल्यानंतर गोव्याने सेनादलाविरुद्ध शानदार विजयी कामगिरी साधली. गोव्याचे आता 6 लढतीनंतर 2 विजय, 1 पराभव, 3 अनिर्णित या कामगिरीसह 18 गुण झाले आहेत. त्यांचा क गटातील शेवटचा सामना 24 जानेवारीपासून छत्तीसगडविरुद्ध खेळला जाईल. सेनादलाचा हा मोसमातील चौथा पराभव ठरला, त्यामुळे त्यांचे 7 गुण कायम राहिले.
संक्षिप्त धावफलक:
सेनादल, पहिला डाव: 175 व दुसरा डाव: 304 पराभूत
वि. गोवा, पहिला डाव: 09 बाद 483 घोषित.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.