गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल (Goa Professional League Football) स्पर्धेत वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबने धेंपो स्पोर्टस क्लबला (Dempo SC) चांगलेच झुंजविले, मात्र अखेरीस सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना गोल नोंदवून माजी विजेत्यांनी मोसमात प्रथमच तीन गुणांची कमाई केली.
सामना सोमवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. २० वर्षांखालील खेळाडू व्हेलान्सो रॉड्रिग्ज याने ८५व्या मिनिटास केलेला गोल धेंपो क्लबसाठी निर्णायक ठरला. गोल्डन ईगल्स संघाचा हा दोन लढतीतील पहिला विजय ठरला. अगोदरच्या लढतीत त्यांना चर्चिल ब्रदर्सने गोलशून्य बरोबरीत रोखले होते. धेंपो क्लबचे आता चार गुण झाले आहेत. वेळसाव क्लबला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला.
सामन्याच्या पूर्वार्धात वेळसाव क्लबने आक्रमणावर जास्त भर देत धेंपो क्लबवर दबाव टाकण्याचे धोरण अवलंबिले, पण गोल झाला नाही. व्हेलिटो क्रूझ याच्या असिस्टवर कॅजिटन फर्नांडिस याचे हेडिंग गोलरक्षकाने रोखल्यामुळे वेळसाव क्लबची गोल नोंदविण्याची चांगली संधी वाया गेली. त्यांच्या चाडेल फर्नांडिसला अचूक नेमबाजी साधण्यात अपयश आले. उत्तरार्धाचा खेळ सुरू झाल्यानंतर डॅरील मस्कारेन्हास याचा सणसणीत फटका गोलपट्टीवरून गेल्यामुळे धेंपो क्लबला गोलखाते उघडता आले नाही.
अपराजित स्पोर्टिंगची आज लढत
स्पर्धेत अपराजित असलेल्या स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाचे दोन लढतीतून चार गुण झाले आहेत. गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी (ता. २६) त्यांच्यासमोर गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबचे आव्हान असेल. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर होईल. गार्डियन एंजलला स्पर्धेतील पहिल्या लढतीत वास्को क्लबविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.