पणजीः विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीत शारीरिक शिक्षण शिक्षकांची (Physical Education Teachers) भूमिका महत्त्वाची असते, त्यादृष्टीने या शिक्षकांनी अधिक कार्यक्षम राहणे आवश्यक असल्याचे मत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Goa CM Dr. Pramod Sawant) यांनी शुक्रवारी व्यक्त केले. राज्यातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडापटू, संघटना यांच्या अनुदान रक्कम वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कोरोना विषाणू महामारी कालखंडात जवळपास चाळीस टक्के शारीरिक शिक्षण शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्तीच्या अनुषंगाने काहीच केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकार साधनसुविधा आणि मानव संसाधनाचे कार्य चोखपणे करत आहे. विद्यार्थ्यांना त्यादृष्टीने सक्षम बनविण्याचे काम शारीरिक शिक्षण शिक्षकांना पूर्णत्वास न्यायचे आहे. विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती राखण्याचे जबाबदारी त्यांचीच आहे. ग्रामीण भागात क्रीडा संस्कृती, तंदुरुस्ती याबाबत जागरुकता नाही. शारीरिक शिक्षण शिक्षकांनी गुणवत्ता शोधण्यावर भर द्यायला हवा, असे मुख्यमंत्री म्हणाले. शारीरिक शिक्षक, तालुका पातळीवरील प्रशिक्षक यांची कार्यक्षमता क्रीडा व युवा व्यवहार खात्याने, तसेच गोवा क्रीडा प्राधिकरणाने वेळोवेळी तपासावी, अशी सूचनाही मुख्यमंत्री सावंत यांनी केली. शारीरिक शिक्षणातील ठोस शालेय अभ्यासक्रमाची गरज त्यांनी प्रतिपादली. याकामी विविध क्रीडा संघटनांचे योगदान निर्णायक ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारच्या विविध खात्यातील नोकरभरतीत क्रीडापटूंसाठी पाच टक्के जागा आरक्षित आहे, पण त्याचा लाभ घेतला जात नसल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी खंत व्यक्त केली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी राज्यात सुमारे तीनशे कोटी रूपये खर्चुन साधनसुविधा निर्मिती झाल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री मनोहर (बाबू) आजगावकर, क्रीडा सचिव अशोक कुमार, क्रीडा संचालक चैतन्य प्रसाद, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाई, प्रशिक्षण संचालक ब्रुनो कुतिन्हो, गोवा ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव गुरुदत्त भक्ता यांची उपस्थिती होती.
प्रलंबित अनुदान वितरीत
राज्यातील पदकविजेते क्रीडापटू, तसेच संघटना यांची दीर्घकाळ प्रलंबित असलेली अनुदान रक्कम शुक्रवारी मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. कोविड-19 निर्बंधामुळे साऱ्या क्रीडापटूंना समारंभास बोलावण्यात आले नव्हते, पण त्यांची रक्कम त्यांना खात्याकडून लवकरच पोच होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 2011-12 पासून प्रलंबित असलेले एकूण 100.3 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून वितरण प्रक्रिया सुरू झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
बांबोळी स्टेडियमला मिल्खा सिंग यांचे नाव
बांबोळी येथील जीएमसी ॲथलेटिक्स स्टेडियमला भारताचे महान धावपटू ‘फ्लाईंग सीख’ मिल्खा सिंग यांचे नाव देण्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी जाहीर केले. 2014 साली लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेनिमित्त बांबोळीत स्टेडियम बांधण्यात आले होते, पण त्याचे नामकरण झाले नव्हते. या वर्षी 18 जून रोजी वयाच्या 91व्या वर्षी निधन झालेल्या मिल्खा यांचे नाव लवकरच या स्टेडियमला देण्यात येईल. काही दिवसांपूर्वी पेडे-म्हापसा येथील हॉकी स्टेडियमला थोर हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते.
गोमंतकीय क्रीडापटूंचीही घेणार दखल
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा मैदानावर यश मिळविलेल्या गोमंतकीय क्रीडापटूंच्या कार्याचीही दखल राज्य सरकार घेणार असून लिओ पिंटो, वॉल्टर डिसोझा, बेनी सिक्वेरा आदी गोमंतकीय क्रीडापटूंचे नाव राज्यातील विविध क्रीडा संकुल, मैदाने यांना देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.
कांपाल येथे क्रीडा नैपुण्य केंद्र
कांपाल येथे क्रीडा नैपुण्य केंद्र विकसित करण्यासाठी राज्य सरकार लवकरच भारतीय क्रीडा प्राधिकरणाशी करार करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितले. या ठिकाणी टेबल टेनिस, बॅडमिंटन व जलतरण या खेळांचे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र असेल.
धारगळला क्रीडानगरी, अकादमी
धारगळ येथे राज्य सरकारने सुमारे 100 एकर जागा क्रीडानगरीसाठी आरक्षित केली आहे. या ठिकाणी क्रीडानगरी विकसित करण्याचे काम महामारीमुळे गती पकडू शकले नाही, पण लवकरच काम पूर्ण करून तेथे 2023 पर्यंत अद्ययावत क्रीडा अकादमी कार्यान्वित करण्याचे प्रयत्न असतील, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.