U-25 CK Nayudu Trophy: छत्तीसगडचा वेगवान गोलंदाज आशिष चौहान याने भन्नाट मारा करताना सात गडी टिपले, त्यामुळे कर्नल सी. के. नायडू करंडक 25 वर्षांखालील क्रिकेट सामन्यात गोव्याचा पहिला डाव 207 धावांत गुंडाळला गेला.
स्पर्धेच्या अ गटातील चार दिवसीय सामना पर्वरी येथील जीसीए मैदानावर रविवारपासून सुरू झाला. सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर छत्तीसगडने 1 बाद 45 धावा केल्या. ते अजून 162 धावांनी मागे आहेत. सलामीचा फलंदाज आदित्य सिंग याला त्रिफळाचीत बाद करून फिरकी गोलंदाज कीथ पिंटो याने गोव्याला पहिले यश मिळवून दिले.
गोव्याच्या फलंदाजांची दाणादाण
आशिषच्या तिखटजाळ माऱ्यासमोर गोव्याची एकवेळ 4 बाद 32 अशी नाजूक स्थिती होती. त्यापूर्वी डावातील चौथ्या षटकात वैभव गोवेकरला शून्यावर जीवदान मिळाले होते. त्याचा लाभ उठवत त्याने अर्धशतक नोंदविले.
पाचव्या विकेटसाठी वैभव (69) व दीप कसवणकर (34) यांनी 85 धावांची भागीदारी केल्यामुळे गोव्याला धावफलकावर शतकी धावसंख्या लावता आली. दीप व वासू तिवारी यांना आशिषने चार चेंडूंच्या फरकाने बाद केल्यामुळे गोव्याचा डाव पुन्हा 6 बाद 119 असा कोसळला.
त्यातच डावखुरा वैभव ओव्हर-थ्रोवर धाव घेताना धावबाद झाल्यामुळे गोव्याला मोठा झटका बसला. तळाच्या कीथ पिंटो, रोहन बोगाटी, हेरंब परब व शुभम तिवारी यांनी किल्ला लढविल्यामुळे गोव्याला दोनशे धावा पार केल्याचे समाधान लाभले.
नव्या खेळाडूंकडून अपेक्षाभंग
गोव्याने छत्तीसगडविरुद्धच्या लढतीत नव्या चेहऱ्यांना संधी दिली, पण त्यांनी साफ निराशा केली. यश पोरोब (6), कौशल हट्टंगडी (4), वासू तिवारी (1) यांना विश्वास सार्थ ठरविता आला नाही. कर्णधार कश्यप बखले (8) व योगेश कवठणकर (0) यांना आशिषने डावातील बाराव्या षटकात चार चेंडूंच्या फरकाने बाद केल्यानंतर गोव्याला सावरणे कठीण गेले.
संक्षिप्त धावफलक
गोवा, पहिला डाव : 63.4 षटकांत सर्वबाद 207 (यश पोरोब 6, वैभव गोवेकर 69, कौशल हट्टंगडी 4, कश्यप बखले 8. योगेश कवठणकर 0, दीप कसवणकर 34, वासू तिवारी 1, कीथ पिंटो 25, रोहन बोगाटी 22, हेरंब परब 12, शुभम तारी नाबाद 10, स्नेहिल चड्डा 1-56, आशिष चौहान 17-2-68-7, गगनदीप सिंग 1-31).
छत्तीसगड, पहिला डाव : 18 षटकांत 1 बाद 45(आदित्य सिंग 10, सानिध्य हुरकत नाबाद 28, प्रतीक यादव नाबाद 7, शुभम तारी 5-0-18-0, हेरंब परब 6-1-20-0, कीथ पिंटो 6-3-6-1, रोहन बोगाटी 1-0-1-0).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.