पणजी : स्नेहल कवठणकरने (Snehal Kavthankar) कर्णधारास साजेरी झुंजार नाबाद शतकी खेळी केली, पण त्याचा संघ पुन्हा एकदा विजय हजारे करंडक (Vijay Hazare Trophy) एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत चोकर्स ठरला. पंजाबविरुद्ध शेवटच्या दोन चेंडूंत विजयासाठी एक धाव नोंदविणे गोव्याला (Goa) शक्य झाले नाही, परिणामी दोन्ही संघांना टाय लढतीतून प्रत्येकी दोन गुण मिळाले. सलग तिसऱ्या लढतीत गोव्याला कचखाऊ कामगिरीमुळे आवाक्यातील विजयाने हुलकावणी दिली.
एलिट ई गट सामना मंगळवारी झारखंडमधील रांची येथे झाला. स्नेहलने जबरदस्त फलंदाजी करताना नाबाद 148 धावा केल्या, त्याचे लिस्ट ए स्पर्धेतील दुसरे शतक ठरले. स्नेहलने पहिलाच सामना खेळणारा यष्टिरक्षक-फलंदाज समर दुभाषी (56) याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली, त्यामुळे बलाढ्य पंजाबने दिलेल्या 289 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणे गोव्याला शक्य झाले, मात्र अखेरीस एक धाव न घेता आल्यामुळे गोव्याने पंजाबइतक्याच धावा केल्यामुळे सामना टाय झाला. शेवटच्या दोन चेंडूंत एकही धाव न करता बाद झालेला अमित यादव गोव्यासाठी खलनायक ठरला.
पंजाबने प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर अनमोलप्रीत सिंग (101) व गुरकीरत मान (1`05) यांच्या शतकांच्या बळावर 8 बाद 288 धावा केल्या. अनमोलप्रीत व गुरकीरत यांनी चौथ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी केली. डावातील शेवटच्या सात चेंडूंत सहा धावांत तीन विकेट गमावल्यामुळे पंजाबला तीनशे धावांचा टप्पा गाठता आला नाही. गोव्याला निर्धारित 50 षटकांत 7 बाद 288 धावात करता आल्या.
गोव्याचा संघ गडबडला
स्नेहलने आदित्य कौशिक (36) याच्यासमवेत 80 धावांची सलामी दिल्यानंतर, समर याच्यासमवेत केलेल्या शतकी भागीदारीमुळे गोव्याचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता. विजयासाठी 14 चेंडूंत 17 धावा हव्या असताना समरला पंजाबच्या अर्शदीप सिंगने त्रिफळाचीत बाद केले. त्यानंतर 49 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर गुरनूर ब्रार याने लक्षय गर्ग (7) याला पायचीत बाद केले. गोव्याला शेवटच्या षटकातील सहा चेंडूंत विजयासाठी आठ धावांची गरज होती. अर्शदीप याने टाकलेल्या षटकातील पहिल्या चेंडूवर स्नेहल धाव घेऊ शकला नाही. दुसऱ्या चेंडूवर त्याने दोन धावा घेतल्या, तर तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला, चौथ्या चेंडूवर एक धाव घेतल्यामुळे नवा फलंदाज अमित यादव स्ट्राईकवर आला. षटकातील पाचव्या चेंडूवर अमित फटका साधू शकला नाही. शेवटच्या चेंडूवर एक धावा हवी असताना अमितने मयांक मार्कंडेच्या हाती झेल दिल्यामुळे गोव्याला विजयाने हुलकावणी दिली.
सलग तिसऱ्या लढतीत चोकर्स
गोव्याचा संघ या स्पर्धेत सलग तिसऱ्या लढतीत चोकर्स ठरला. सेनादलाविरुद्ध शेवटच्या विकेटने 58 धावांची भागीदारी केल्यामुळे गोव्याला पराभव पत्करावा लागला. नंतर रेल्वेने अखेरच्या षटकात 19 धावा असताना 22 धावा करून सामना जिंकला, तर पंजाबविरुद्ध गोव्याला शेवटच्या दोन चेंडूंत विजयासाठी एक धाव नोंदविता आली नाही.
गटात गोवा चौथा
ई गटातील गोव्याची मोहीम मंगळवारी संपली. पाच लढतीत एक विजय, तीन पराभव व एक टाय अशा कामगिरीसह त्यांनी सहा गुणांची कमाई केली. त्यांना चौथा क्रमांक मिळाला. गटात सेनादल व राजस्थानचे समान 16 गुण झाले. त्यांना अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक मिळाला. पंजाब 14 गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिला. आसाम व रेल्वेचे समान चार गुण झाले. त्यांना अनुक्रमे पाचवा व सहावा क्रमांक मिळाला.
संक्षिप्त धावफलक
पंजाब : 50 षटकांत 8 बाद 288 (अनमोलप्रीत सिंग 101- 119 चेंडू, 11 चौकार, 1 षटकार, गुरकीरत मान 105- 88 चेंडू, 11 चौकार, 4 षटकार, लक्षय गर्ग 9-0-51-3, फेलिक्स आलेमाव 8-1-55-1, विजेश प्रभुदेसाई 8-0-41-1, अमित यादव 10-0-56-1, शुभम रांजणे 6-0-33-0, सुयश प्रभुदेसाई 2-0-18-0, अमूल्य पांड्रेकर 7-0-34-1) टाय विरुद्ध गोवा : 50 षटकांत 7 बाद 288 (स्नेहल कवठणकर नाबाद 148- 141 चेंडू, 16 चौकार, 3 षटकार, आदित्य कौशिक 36, कश्यप बखले 5 सुयश प्रभुदेसाई 8, शुभम रांजणे 12, समर दुभाषी 56- 75 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार, लक्षय गर्ग 7, अमित यादव 0, गुरनूर ब्रार 10-0-62-1, अर्शदीप सिंग 10-0-70-2, हरप्रीत ब्रार 10-0-42-1, मयांक मार्कंडे 10-0-42-2, अभिषेक शर्मा 9-0-58-1).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.