Goa Football : गोवा फुटबॉलला आता 'भिवपाची गरज ना'

नवनियुक्त अध्यक्ष कायतान यांनी ग्वाही; निर्विवाद वर्चस्व, जीएफए कार्यकारी समितीत फक्त तिघे विरोधक
Goa Football Association Election | Caitano Fernandes
Goa Football Association Election | Caitano Fernandes Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Football : गोवा फुटबॉल संघटना (जीएफए) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय प्राप्त केलेल्या कायतान जुझे फर्नांडिस यांच्यासह त्यांच्या गटाने कार्यकारी समितीत निर्विवाद वर्चस्व राखले. एकूण 21 सदस्यीय समितीत कायतान यांच्या गटातील एकूण 18 जण असून तर विरोधकांत फक्त तिघेच आहेत, या पार्श्वभूमीवर नव्या अध्यक्षाने गोव्यात फुटबॉलला घाबरण्याची अजिबात गरज नसल्याची ग्वाही रविवारी निवडणूक निकालानंतर दिली.
दोना पावला येथील उद्योजक कायतान हे ‘फुटबॉल क्लब तुये’चे अध्यक्ष आहेत.

जीएफए निवडणूक लढविण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे, पण आपण फुटबॉलसाठी नवखा नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले. ‘‘जीएफए खेळाडूंची नोंदणी ठेवत नाही, त्यामुळे मी खेळाडू असल्याचे दस्तऐवज नाहीत, पण मी भरपूर फुटबॉल खेळलोय. शालेय, महाविद्यालयीन, ग्राम पातळीवरील मी खेळाडू आहे. फुटबॉलशी माझे नाते खूप जुने आहे,’’ असे कायतान म्हणाले. अध्यक्षपदी विजयी झाल्यानंतर ते खूपच भावूक झाले. उपाध्यक्षपदी निवडून आलेले जोनाथन डिसोझा यांनी घेतलेल्या मेहनतीचाही त्यांनी खास उल्लेख केला. पाठिंबा दिलेल्या सर्व क्लबांचे त्यांनी आभार मानले.

विश्वासाला पात्र ठरण्याचे आश्वासन

आता फुटबॉलला गोव्यात ‘भिवपाची गरज ना’ असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शैलीत सांगत, कायतान यांनी क्लबांनी दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचे आश्वासन दिले. राज्य सरकारच्या गोवा फुटबॉल विकास मंडळाचे (जीएफडीसी) ते कार्यकारी सदस्यही आहेत. गोव्यातील फुटबॉल प्रगतीसाठी आपल्याला राज्य सरकारचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी यापूर्वीच केला होता. ‘‘सहा महिन्यांत राज्यातील फुटबॉलप्रती आश्वासक चित्र दिसेल. सर्वप्रथम गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धा सुरू करण्यासाठी प्रयत्न होतील. मी स्वतः ही स्पर्धा पुरस्कृत करण्यास इच्छुक आहे. गेली आठ वर्षे बक्षीस रक्कम देण्यात आलेली नाही. हा रखडलेला प्रश्न मार्गी लावण्यात येईल,’’ असे सीएएम ग्रुपचे संचालक असलेले कायतान रविवारी जिंकल्यानंतर म्हणाले.

फुटबॉलला गतवैभव देण्याचे ध्येय

‘‘गोमंतकीय फुटबॉलला गतवैभव मिळवून देण्याचे ध्येय बाळगले आहे. आता जीएफए कार्यपद्धतीत बदल निश्चित आहेत. दोन महिन्यापूर्वी क्लबांकडून मिळत असलेल्या पाठिंब्याने विजयाची चाहूल लागली होती. सहा महिन्यापूर्वीं सहकाऱ्यांसह मी मोर्चेबांधणीस सुरवात केली होती. क्लबासमोर मी योजना मांडली, त्यांनी स्वागत केले,’’ असे कायतान म्हणाले. धुळेर-म्हापसा येथील फुटबॉल स्टेडियमच्या साधनसुविधांचे नूतनीकरण, जीएफएच्या विविध स्पर्धांची आणि स्पर्धा नियमांची पुनर्रचना, महिला फुटबॉलमध्ये सुधारणा, फुटबॉलपटू नोंदणी प्रक्रियेसाठी विभागीय कार्यालये, फुटबॉल रेफरी, अधिकारी आणि प्रशिक्षकांसाठी विमा योजना आदींचा कायतान यांच्या योजनेत समावेश आहे. गोव्याचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आणि निवृत्त जकात अधिकारी लेस्टर मास्कारेन्हास यांची जीएफए सचिवपदी नियुक्ती करण्याचे कायतान यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

Goa Football Association Election | Caitano Fernandes
Goa Football Association Election : चर्चिल आलेमाव यांच्या फुटबॉल वर्चस्वाला जोरदार धक्का

कायतान गटाचे बार्देशात वर्चस्व

कार्यकारी समिती निवडणुकीत कायतान यांच्या गटातील दोघेही उपाध्यक्ष विजयी ठरले. जोनाथन यांनी उत्तर, तर अँथनी पांगो यांनी दक्षिणतून बाजी मारली. बार्देश विभागातील सदस्यपदाच्या पाचही जागा कायतान गटाने जिंकल्या. यामध्ये ओमकार वायंगणकर, प्रवीण दाभोळकर, लक्ष्मण हडफडकर, जोनाथन, उदय लिंगुडकर हे विजयी झाले. उपाध्यक्ष व सदस्यपदी निवडून आल्याने आता जोनाथन सदस्यपदाचा राजीनामा देतील. सिकेरी क्लबचे लक्ष्मण हे डिचोली तालुक्यातील एकमेव ठरले. सूत्रांनुसार, बार्देश सदस्यपदाचा जोनाथन यांनी राजीनामा दिल्यानंतर, नवा सदस्य स्वीकृत असेल. त्या जागी बाबली मांद्रेकर यांची वर्णी लागण्याचे संकेत आहेत.

सासष्टीत चर्चिल यांना दणका

सासष्टी हा चर्चिल आलेमाव यांचा बालेकिल्ला मानता जातो, पण त्यांना या विभागात दणका बसला. सात सदस्यपदासाठी झालेल्या निवडणुकीत कायतान गटाचे सहा जण निवडून आले. चर्चिल गटाचे फक्त जाजू फर्नांडिस हेच विजयी ठरले. पॅटविन फिझार्दो, कॉस्तान्सियो पावलो रॉड्रिग्ज, कॉस्मे ऑलिव्हेरा, शुबर्ट फुर्तादो, रवींद्र काब्राल, अँथनी लिओ फर्नांडिस हे सहा सदस्य कायतान गटाचे आहेत. या गटाचे कुस्तोदियो फर्नांडिस पराभूत झाले.

मुरगावात ॲडलियर यांना धक्का

मुरगाव विभागात कायतान गटाचे अनुभवी आणि संघटनेचे माजी सचिव ॲडलियर डिक्रूझ यांना सदस्यपदाच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला. या विभागातून कायतान गटाचे फ्रान्सिस जुझे नुनीस, तसेच विरोधी गटातील ॲड्र्यू फेर्राव निवडून आले.

तिसवाडी विभाग बिनविरोध

जीएफएच्या सदस्यपदी तिसवाडी विभागातील चारही जागा बिनविरोध ठरल्या होत्या. संजीव नागवेकर, ॲगी आल्मेदा व मॉरिसियो आल्मेदा हे तिघेही कायतान गटाचे असून अँथनी फ्रान्सिस वाझ हे विरोधी गटातील आहेत.

दृष्टिक्षेपात जीएफए निवडणूक निकाल (कंसात मते)
अध्यक्ष : विजयी : कायतान जुझे फर्नांडिस (83), पराभूत : व्हालेन सावियो आलेमाव (47), जुझे वेल्विन मिनेझिस (29)
उपाध्यक्ष (उत्तर) : विजयी : जोनाथन डिसोझा (39), पराभूत : डॉमनिक परेरा (23), व्हिक्टर ग्रेगरी फर्नांडिस (15)
उपाध्यक्ष (दक्षिण) : विजयी : अँथनी पांगो (44), पराभूत : फिलोमेनो कॉस्ता (38)
सदस्य (बार्देश) 5 : विजयी : ओमकार वायंगणकर (56), प्रवीण दाभोळकर (52), लक्ष्मण हडफडकर (49), जोनाथन डिसोझा (47), उदय लिंगुडकर (37), पराभूत : ग्रेग डिसोझा (36), पॅट्रिक डिसोझा (34), जॉन फर्नांडिस (27), जुझे मिस्किता (22).
सदस्य (सासष्टी) 7 : विजयी : पॅटविन फिझार्दो (56), कॉस्तान्सियो पावलो रॉड्रिग्ज (54), कॉस्मे ऑलिव्हेरा (46), शुबर्ट फुर्तादो (45), रवींद्र काब्राल (45), जाजू फर्नांडिस (40), अँथनी लिओ फर्नांडिस (37), पराभूत : कुस्तोदियो फर्नांडिस (34), जॉन सिल्वा (33), दिओनिझियो डायस (32), बार्थोलोम्यू गोम्स (31), डॉमनिक मेंडिस (29), डेव्हिड फर्नांडिस (28), चाल्टन फुर्तादो (21).
सदस्य (मुरगाव) 2 : विजयी : अँड्र्यू फेर्राव (58), फ्रान्सिस नुनीस (52), पराभूत : ॲडलियर डिक्रूझ
सदस्य (तिसवाडी) 4 : बिनविरोध विजयी : संजीव नागवेकर, मॉरिसियो आल्मेदा, अँथनी फ्रान्सिस वाझ, ॲगी आल्मेदा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com