Shikha Pandey
Shikha PandeyDainik Gomantak

T20 Cricket Tournament: गोव्याच्या महिलांची विजयी 'हॅटट्रिक'

गोव्याच्या (Goa) महिलांनी दमदार फॉर्म कायम राखताना सीनियर गट टी-20 क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी विजयी हॅटट्रिक साधली.
Published on

पणजी: गोव्याच्या महिलांनी दमदार फॉर्म कायम राखताना सीनियर गट टी-20 क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी विजयी हॅटट्रिक साधली. विदर्भावर सात विकेट्स आणि दोन चेंडू राखून शानदार विजय नोंदवत त्यांनी एलिट ड गटात अव्वल स्थानही प्राप्त केले. त्यांना आता बाद फेरीची चांगली संधी आहे. सामना मोहाली येथील आय. एस. बिंद्रा क्रिकेट (Cricket) स्टेडियमवर प्रकाशझोतात झाला. गोव्याने आता ओळीने तीन सामने जिंकले असून त्यांचे 12 गुण झाले आहेत. विदर्भाला सलग तिसरा पराभव पत्करावा लागला.

कर्णधार शिखा पांडे (Shikha Pandey) व संजुला नाईक यांनी चौथ्या विकेटसाठी केलेली 84 धावांची अभेद्य भागीदारी गोव्याच्या विजयात निर्णायक ठरली. त्यामुळे सातव्या षटकातील 3 बाद 21 वरून गोव्याने विजयी लक्ष्य गाठताना 19.4 षटकांत 3 बाद 105 धावा केल्या. विदर्भाची वेगवान गोलंदाज कोमल झांझड हिने चार षटकांत फक्त आठ धावा देत तीन विकेट्स टिपल्यामुळे गोव्याचा डाव गडगडला होता, मात्र महिला कसोटीपटू शिखाने सारा अनुभव पणाला लावत संजुलाच्या साथीत विजय निसटू दिला नाही. शिखाने 45 चेंडूंत चार चौकार व एका षटकाराच्या मदतीने नाबाद 49 धावा केल्या. संजुलाने नाबाद 37 धावांच्या खेळीत 44 चेंडूंचा सामना करताना तीन चौकार मारले.

Shikha Pandey
IPL 2021: विराटचा आणखी एक मोठा निर्णय, RCB चं कर्णधारपदही सोडलं

विदर्भ ‘रन-आऊट’

त्याअगोदर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना विदर्भाची स्थिती चांगली होती, मात्र पाच जणी धावबाद झाल्यामुळे त्यांचा डाव गडगडला. नऊ विकेट्स 48 धावांत गमावल्यामुळे डावातील तीन चेंडू बाकी असताना विदर्भाचा डाव 104 धावांत आटोपला. गोव्यातर्फे तेजस्विनी दुर्गड हिने 18 धावांत तीन विकेट्स प्राप्त केल्या. विदर्भाच्या डावात सलामीची वैष्णवी खांडकर हिने सर्वाधिक 44 धावा केल्या. तिने 59 चेंडूंतील खेळीत चार चौकार मारले. ती सुद्धा धावबाद झाली.

Shikha Pandey
IPL auction 2022: U-19 'हा' खेळाडू CSK ला विकला 1.5 कोटींना

एलिट ड गटातील स्थिती

एलिट ड गटात गुरुवारी गुजरातने उत्तराखंडला आठ विकेट्स राखून, तर बडोद्याने उत्तर प्रदेशला सहा विकेट्स राखून हरविले. आता प्रत्येकी तीन सामने खेळल्यानंतर गोव्याचे १२, बडोदा व उत्तर प्रदेशचे प्रत्येकी आठ, गुजरात व उत्तराखंडचे प्रत्येकी चार, तर विदर्भाचे शून्य गुण आहेत.

संक्षिप्त धावफलक

विदर्भ ः १९.३ षटकांत सर्वबाद १०४ (वैष्णवी खांडकर ४४, शिखा पांडे ०-१५, निकिता मळीक ०-६, मेताली गवंडर १-६, सुनंदा येत्रेकर १-१४, पूर्वा भाईडकर ०-२४, रुपाली चव्हाण ०-१९, तेजस्विनी दुर्गड ३-१८) पराभूत वि. गोवा ः १९.४ षटकांत ३ बाद १०५ (पूर्वजा वेर्लेकर ०, श्रेया परब ६, तेजस्विनी दुर्गड ६, शिखा पांडे नाबाद ४९, संजुला नाईक नाबाद ३७, कोमल झांझड ३-८).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com