पणजीः विश्वकरंडक (कॅडेट्स व युवा) बुद्धिबळ (World Cup Cadets and Youth Chess) स्पर्धेत गोव्याचा युवा बुद्धिबळपटू एथन वाझ (Goa Chess Player Ethan Vaz) याला १० वर्षांखालील खुल्या गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू तुर्कीचा कँडिडेट मास्टर यागिझ कान एर्दोग्मुस याच्याकडून गोमंतकीय खेळाडूस अंतिम लढतीत हार पत्करावी लागली. एथन आपला दहावा वाढदिवस शुक्रवारी (ता. ३) साजरा करत आहे, त्यापूर्वीच त्याला विश्वकरंडक रौप्यपदकाचे बक्षीस मिळाले. विश्वकरंडक स्पर्धेत पोडियम मिळाल्यामुळे एथनला आता फिडेच्या विश्वकरंडक सुपर फायनल्ससाठी थेट पात्रता मिळाली आहे. ही स्पर्धा डिसेंबरमध्ये खेळली जाईल. साखळी पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत विविध वयोगटात जागतिक पातळीवरील सहा उत्कृष्ट खेळाडूंत चुरस असेल.
गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी विश्वकरंडक रौप्यपदक विजेत्या एथनचे अभिनंदन केले आहे. ‘‘एथनची कामगिरी कौतुकास्पद असून तो युवा बुद्धिबळपटूंसाठी आदर्शवत ठरला आहे. त्याच्या बुद्धिबळ वाटचालीत माझ्यापरीने मी सर्वोतपरी प्रयत्न करेन,’’ असे युवा बुद्धिबळपटूस शाबासकी देताना तेंडुलकर यांनी सांगितले. एथनची कामगिरी गोवा आणि भारतासाठी भूषणावह, तो नक्कीच याहून मोठे शिखर गाठेल, असा विश्वास गोवा बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी व्यक्त केला. गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव शरेंद्र नाईक, खजिनदार किशोर बांदेकर यांनी एथनचे अभिनंदन केले आहे. सासष्टी तालुक्यातील राय येथील एथन सां जुझे द आरियल येथील द किंग्ज स्कूलचा विद्यार्थी आहे. पालक एडविन वाझ आणि लिंडा फर्नांडिस यांनी मुलाचे कौतुक, विश्वकरंडकात देशाचे प्रतिनिधित्व करताना विश्वविजेतेपदासाठी दावा करण्याची कामगिरी रोमांचित करणारी असल्याचे नमूद केले. विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेत एथनने मानांकित खेळाडूंवर धक्कादायक विजय नोंदविले. त्याने एकंदरीत १३ मानांकित खेळाडूंना चकीत केले, यामध्ये तिघा कँडिडेट मास्टर खेळाडूंचा समावेश होता. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून एथनने सुवर्णपदकाचे लक्ष्य बाळगले होते, असे त्याचे प्रशिक्षक प्रकाश सिंग यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.