संयुक्त अरब अमिराती संघाला (UAE) आगामी टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेची पात्रता मिळवता आलेली नाही. यानंतर आता युएई क्रिकेटने मोठा निर्णय घेतला आहे. युएई क्रिकेटने पुरुषांच्या वरिष्ठ संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी भारताचे माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांची नियुक्ती केली आहे.
यापूर्वी युएईचे प्रभारी प्रशिक्षकपद मुदस्सर नझर सांभाळत होते, मात्र आता युएईने राजपूत यांच्यासह मुख्य प्रशिक्षक म्हणून तीन वर्षांसाठी करार केला आहे.
राजपूत यांच्याकडे प्रशिक्षक म्हणून चांगला अनुभव आहे. भारतीय क्रिकेट संघाने 2007 साली झालेला पहिला-वहिला टी20 वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी लालचंद राजपूत यांनी भारतीय संघाचे मॅनेजर आणि प्रशिक्षकाची भूमिका निभावली होती.
तसेच त्यांनी अफगाणिस्तान संघाचेही 2016-2017 दरम्यान प्रशिक्षक म्हणून काम पाहिल. त्यानंतर त्यांनी 2018 ते 2022 दरम्यान झिम्बाब्वेचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.
या नव्या जबाबदारीबद्दल राजपूत म्हणाले, 'गेल्या काही वर्षात युएई एक मजबूत संघ म्हणून समोर आला आहे. खेळाडूंनीही वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सध्याची खेळाडूंची बॅच प्रतिभाशाली आहे. मी त्यांच्याबरोबर काम करण्यात आणि त्यांच्या कौशल्याला धार लावण्यास उत्सुक आहे.'
युएईचे प्रशिक्षक म्हणून राजपूत यांच्यासमोर पहिले आव्हान स्कॉटलंड आणि कॅनडा संघांविरुद्ध होणाऱ्या तिरंगी मालिकेचे असणार आहे. ही मालिका 2027 वनडे वर्ल्डकपच्या पात्रतेसाठी महत्त्वाची आहे.
एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे सरचिटणीस मुबाशशीर उस्मानी यांनी आशा व्यक्त केली की राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली युएई संघ प्रगती करेल. तसेच त्यांनी मुदस्सर नझर यांचेही आभार मानले असून ते आता पुन्हा नॅशनल ऍकेडमी प्रोग्राममध्ये काम सुरू करतील असे सांगितले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.