IPL 2023: गिलचा फॉर्म ते हार्दिकची कॅप्टन्सी; गुजरातने सलग दुसऱ्यांदा फायनल गाठण्याची 5 कारणे

गुजरात टायटन्सने सलग दुसऱ्यांदा आयपीएलची फायनल गाठली असून त्यांच्या यशामागची काय कारणे आहेत, हे जाणून घ्या.
Gujarat Titans
Gujarat TitansDainik Gomantak
Published on
Updated on

Five Reasons Why Gujarat Titans reach IPL Final: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात 62 धावांनी मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवत गुजरात टायटन्सने अंतिम सामन्यातील स्थान पक्के केले. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सने सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवले.

गुजरातने गेल्यावर्षी आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. यंदाही त्यांना विजेतेपद जिंकण्याची संधी आहे. महत्त्वाचे म्हणजे गुजरातने आयपीएल 2023 हंगामात गेल्यावर्षीप्रमाणेच दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी साखळी फेरीतील 14 पैकी तब्बल 10 सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल क्रमांक पटकावला.

पण, गुजरातच्या या यशामागे नक्की काय कारणे आहेत, याबद्दलच थोडक्यात आढावा घेऊ.

Gujarat Titans
Mumbai Indians: मुंबईला का करावं लागलं IPL 2023 मधून पॅकअप? जाणून घ्या 3 मोठी कारणं

1. शुभमन गिलचा शानदार फॉर्म

गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल सध्या दमदार फॉर्मममध्ये आहे. तो जवळपास प्रत्येक सामन्यात गुजरातला चांगली सुरुवात मिळवून देत आहे. त्याचा फॉर्म ही आयपीएल २०२३ हंगामात गुजरातसाठी सर्वात मोठी जमेची बाजू ठरली आहे.

त्यातच अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे गुजरातचे घरचे मैदान आहे आणि याच मैदानावर गिलची कामगिरीही शानदार राहिली आहे. त्याचाही फायदा गुजरातला झालेला दिसला आहे.

गिल परिस्थितीनुरूप त्याचा खेळ करू शकतो. तसेच तो अनेकदा गुजरातच्या फलंदाजीची एक बाजू भक्कमपणे सांभाळताना दिसला आहे. समोरून विकेट्स गेल्यातरी दुसऱ्या बाजूने तो उभा राहिल्याने गुजरातला मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळाले आहे.

विशेष म्हणजे यंदाच्या हंगामात गिलने आत्तापर्यंत 16 सामन्यांमध्ये 60.79 च्या सरासरीने 851 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 3 शतकांचा आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.

Gujarat Titans
IPL 2023: गेल्यावर्षी 9 वा क्रमांक, पण यंदा थेट फायनलमध्ये! CSK च्या 'परफेक्ट कमबॅक'ची 5 कारणे

2. अनुभवी गोलंदाजी

गुजरात टायटन्सच्या आत्तापर्यंतच्या यशास गिलच्या फलंदाजीबरोबरच सर्वात मोठे योगदान त्यांच्या गोलंदाजी फळीचे राहिले आहे. गुजरातकडे मोहम्मद शमी, मोहित शर्मा आणि राशिद खान हे तीन आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव असणारे गोलंदाज आहेत. या तिघांनीही या हंगामात दमदार कामगिरी केली आहे.

विशेष म्हणजे आयपीएल 2023 हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या पहिल्या तीन गोलंदाजांच्या यादीत हे तिघेच आहेत. या तिघांनीही प्रत्येकी 24 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. शमी सुरुवातीच्या षटकांमध्ये, राशिद मधल्या षटकांमध्ये आणि मोहित अखेरच्या षटकांमध्ये सर्वाधिक प्रभावित ठरताना दिसत आहेत.

त्याचमुळे या तिघांचा अनुभव पूर्ण डावात गुजरातसाठी उपयोगी पडत आहे. या तिघांनाही कर्णधार हार्दिक पंड्या, नूर अहमद, जोशुआ लिटिल, यश दयाल अशा गोलंदाजांची साथही मिळत आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात सर्वात घातक गोलंदाजी फळी असणाऱ्या संघांपैकी गुजरात एक संघ ठरला आहे.

  • मोहितचे योगदान

दरम्यान, मोहितला संधी देऊन गुजरातने अनेकांना चकीत केले होते. खरंतर मोहितने यापूर्वी 2014 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून पर्पल कॅप जिंकली आहे. तसेच त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचाही अनुभव आहे. पण त्याला गेल्या तीन आयपीएल हंगामात कोणत्याच संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.

विशेष म्हणजे तो 2022 मध्ये नेट गोलंदाज म्हणून गुजरात संघात दाखल झाला होता. मात्र, त्यानंतर 2023 साठी गुजरातने त्याला खेळण्याची संधी दिली, त्यानेही दणक्यात पुनरागमन करत गुजरातच्या यशात मोलाचे योगदान दिले.

Gujarat Titans
IPL 2023, Qualifier: मुंबईकडून गुजरातविरुद्ध 12 नाही, तर 13 खेळाडू उतरले मैदानात, कसं ते घ्या जाणून

3. हार्दिक पंड्याचे नेतृत्व

गेल्यावर्षी हार्दिकने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देत, त्याच्यातील नेतृत्व कौशल्य दाखवले होते. यंदाच्या हंगामातही त्याच्यातील चतुर कर्णधार सर्वांना पाहायला मिळाला आहे.

हार्दिकने अनेकदा घेतलेले निर्णय महत्त्वाचे ठरले आहेत. त्याने गुजरातच्या क्षेत्ररक्षणावेळी गोलंदाजीत केलेले बदल, योग्य वेळी योग्य गोलंदाजाला दिलेली गोलंदाजी यामुळे संघाच्या बाजूने सामना झुकण्यात मदत झाली आहे. नुकतेच सुनील गावसकरांनीही हार्दिकच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे.

4. युवा खेळाडूंचे योगदान

यंदाच्या हंगामात गुजरातकडून अनेक युवा खेळाडूंचे योगदानही महत्त्वाचे ठरले आहे. गिल शिवाय साई सुदर्शन, अभिनव मनोहर यांनी संधी मिळेल, तेव्हा फलंदाजीत भरीव योगदान दिले आहे. तसेच नूर अहमद राशिद खानबरोबर चांगली फिरकी गोलंदाजी करताना दिसला आहे. त्यामुळे गुजरात संघाला अनुभवी आणि युवा खेळाडूंना मिळून संघाचा योग्य समतोलही साधण्यात मदत झाली.

5. सपोर्ट स्टाफचे मार्गदर्शन

गुजरात संघाच्या यशात सपोर्ट स्टाफचाही मोठा वाटा राहिला. प्रमुख प्रशिक्षक आशिष नेहरा, गॅरी कर्स्टर्न अशा अनुभवी खेळाडूंनी बनवलेल्या रणनीती संघासाठी उपयोगी पडत असल्याचे दिसून आले.

नेहरा सामन्यावेळी नेहमीच बाउंड्री लाईनजवळ खेळाडूंना सल्ले देतानाही दिसला आहे. त्याचबरोबर त्याचे आणि संघाचा कर्णधार हार्दिक यांची चांगील बाँडिंगही आहे. ज्यावेळी संघाच्या प्रशिक्षकांमध्ये आणि खेळाडूंमध्ये चांगली बाँडिंग असते, तेव्हा त्याचे चांगले परिणाम मैदानातही दिसून येतात. हीच गोष्ट गुजरात संघाच्या बाबतीतही दिसून आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com