Video: ब्राझील-अर्जेंटिना मॅचदरम्यान वातावरण तापलं! स्टेडियममधील हाणामारी पाहून मेस्सीने सोडलं मैदान
FIFA World Cup Qualifiers, Argentina vs Brazil, Fight in Stadium:
फिफा वर्ल्डकप 2026 साठी सध्या क्वालिफायर्स खेळले जात आहेत. दरम्यान नुकतेच बुधवारी अर्जेंटिना आणि ब्राझील यांच्यात सामना झाला. मात्र, हा सामना सुरू होण्यापूर्वीच स्टेडियममधील वातावरण बरेच तापलेले दिसले होते. त्यामुळे सामन्यालाही तब्बल अर्धातास उशीर झाला.
रिओ दी जानेरोमधील माराकाना स्टेडियममध्ये हा सामना झाला. मात्र, या सामन्याला स्टेडियममध्ये झालेल्या मारामारीने गालबोट लागले. या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार जेव्हा ब्राझील आणि अर्जेंटिना संघाचे खेळाडू राष्ट्रगीतासाठी मैदानात आले होते. तेव्हा अचानक कॅमेरा स्टँड्सकडे वळला, त्यावेळी चाहत्यांमध्ये काहीतरी गोंधळ झाल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनीही लाठी चार्ज केल्याचे दिसले. ते सर्व दृश्य पाहून खेळाडूही चकीत झाले होते.
पोलिसांनी अर्जेंटिनाच्या चाहत्यांवरही लाठी उगारल्याचे दिसले. यात काही चाहते जखमी झाल्याचेही दिसून आले. या सर्व गोष्टींनंतर अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनल मेस्सी सामनाधिकाऱ्यांशी बोलताना दिसला. त्यानंतर त्याने अर्जेंटिनाच्या संघसहकाऱ्यांसह मैदान सोडण्याचा निर्णय घेतला.
मात्र, नंतर अर्जेंटिनाचा संघ अर्ध्या तासाने मैदानात उतरला आणि भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6.30 वाजता सामन्याला सुरुवात झाली. त्या सामन्यात 63 व्या मिनिटाला निकोलस ओटामेंडीने हेडर मारत अर्जेंटिनासाठी गोल नोंदवला. हा गोल अर्जेंटिनासाठी विजयी गोल ठरला. हा सामना अर्जेंटिनाने 1-0 असा जिंकला.
या सामन्यात पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोलच्या संधी मिळाल्या होत्या, मात्र तरी गोल करता आला नाही. तसेच दुसऱ्या हाफमध्ये ब्राझीलकडून चांगली सुरुवात झालेली, मात्र अर्जेटिनाचा गोल झाल्याने त्यांनी विजय मिळवला.
साऊथ अमेरिकन क्वालिफायिंग ग्रुपमध्ये अर्जेंटिना सध्या 5 सामन्यांतील 12 गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. उरुग्वे दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचे 10 गुण आहेत. तसेच कोलंबियाचे 9 गुण आहेत, तर वेनेझुएलाचे आठ गुण आहेत. ब्राझिल सात गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा युनायटेड स्टेट्स, मेक्सिको आणि कॅनडा येथे होणार आहे. या स्पर्धेत 48 संघ खेळणार आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.