ISL: एफसी गोवाची आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील कामगिरी लौकिकाला साजेशी नाही. त्यांची घसरण झालेली असली तरीही ते आशावादी आहेत. ओडिशा एफसीविरुद्ध, तसेच बाकी लढतीत संघाची परिस्थितीनुरूप योजना असेल, त्याचवेळी संघ आक्रमक शैलीला मुरड घालणार नाही, असे मुख्य प्रशिक्षक डेरिक परेरा यांनी सोमवारी सांगितले. (FC Goas plan for the situation Derrick Pereira)
एफसी गोवा (FC Goa) आणि ओडिशा एफसी यांच्यातील सामना मंगळवारी (ता. १) बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर खेळला जाईल. मागील लढतीत वर्चस्व राखूनही एफसी गोवास जमशेदपूरकडून एका गोलने हार पत्करावी लागली. मागील नऊ सामन्यांत त्यांनी एकच विजय नोंदविला आहे, तसेच चार सामने ते विजयाविना असून फक्त दोन गुण प्राप्त केले आहेत. मात्र आयएसएल स्पर्धेत एफसी गोवाने ओडिशाविरुद्ध एकही पराभव पत्करलेला नाही.
‘‘आम्ही शैली अजिबात बदलणार नाही. आमच्या तत्वज्ञानाशी चिकटून राहू. तथापि, परिस्थितीनुसार प्रतिस्पर्ध्यांची बलस्थाने आणि कच्चे दुवे हेरून आम्ही दुसऱ्या योजनेची अमलबजावणी करू शकतो,’’ असे 59 वर्षी डेरिक ओडिशाविरुद्ध लढतीच्या पूर्वसंध्येला म्हणाले. ‘‘कोविडमुळे (Covid-19) उद्भवलेल्या परिस्थितीमुळे जानेवारीत संघाच्या सराव, तसेच इतर हालचालींवर मर्यादा आल्या. आता सारे पूर्वपदावर येईल, खेळाडूंच्या मानसिकतेस मदत होईल आणि बाकी सामन्यांत आमची कामगिरीही सुधारेल अशी आशा बाळगतो,’’ असे ते म्हणाले. ओडिशाविरुद्ध अनुभवी ब्रँडन फर्नांडिस खेळणार असल्याचे त्यांनी नमूद केले, मात्र ग्लॅन मार्टिन्स व होर्गे ओर्तिझ खेळण्याबाबत त्यांनी आशा व्यक्त केली.
‘एफसी गोवाचे निकाल निराशाजनक’
एफसी गोवाचे आतापर्यंतचे निकाल निराशाजनक असल्याचे डेरिक यांनी मान्य केले. ‘‘आमचे निकाल अत्यंत निराशाजनक आहेत. प्रत्येक सामन्यासाठी आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम खेळण्यासाठी जातो. तसे असूनही गोल होत नाहीत. काही निर्णय आमच्या बाजूने देण्यात आले नाहीत, मोसमात आम्ही संघर्ष करण्यामागे हे सुद्धा एक कारण आहे,’’ असे डेरिक म्हणाले.
तीन गुणांचा फरक
एफसी गोवा आणि ओडिशा यांच्यात सध्या तीन गुणांचा फरक आहे. दोन्ही संघांत सातत्याचा अभाव आहे. ओडिशाचे 13 लढतीनंतर 17 गुण असून एक सामना जास्त खेळलेल्या एफसी गोवाचे 14 गुण आहेत. सध्या ते अनुक्रमे आठव्या व नवव्या क्रमांकावर असून मंगळवारी विजय नोंदविणारा संघ गुणतक्त्यात प्रगती साधेल. किनो गार्सिया यांच्या मार्गदर्शनाखालील ओडिशाला मागील लढतीत हैदराबादकडून 2-3 फरकाने हार पत्करावी लागली. एफसी गोवाने 23, तर ओडिशाने 27 गोल स्वीकारले आहेत. भुवनेश्वरच्या संघावर प्रतिस्पर्ध्यांनी 14 वेळा सेटपिसेसवर गोल केले आहेत.
ओडिशाविरुद्ध एफसी गोवा अपराजित
- आयएसएल स्पर्धेतील 5 लढतीत एफसी गोवाचे 4 विजय, 1 बरोबरी
- गतमोसमात एफसी गोवा बांबोळी येथे 1-0, तर फातोर्डा येथे 3-1 फरकाने विजयी
- यंदा पहिल्या टप्प्यात वास्को येथे 1-1 गोलबरोबरी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.