पणजी: आघाडीफळीतील सुश्मिता जाधव हिने नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर एफसी गोवा (FC Goa) संघाने गोवा (Goa) फुटबॉल असोसिएशनच्या वेदांता महिला फुटबॉल लीगमध्ये शनिवारी सलग दुसरा विजय नोंदविला. धर्मापूर येथील मैदानावर झालेल्या लढतीत गतउपविजेत्यांनी कॉम्पॅशन एफसीवर 2-0 फरकाने मात केली.
सलग दुसऱ्या विजयासह एफसी गोवा संघाने आता पाच संघांच्या स्पर्धेत अव्वल स्थान मिळविले आहे. अगोदरच्या लढतीत त्यांनी युनायटेड क्लब तळावली संघास तीन गोलनी हरविले होते. कॉम्पॅशन एफसीला सलग दुसरा सामना गमवावा लागला. स्पर्धेतील पहिल्या लढतीत शिरवडे स्पोर्टस क्लबने त्यांचा दहा गोलने धुव्वा उडविला होता. तुलनेत आज कॉम्पॅशन संघाने कामगिरीत सुधारणा प्रदर्शित केली, त्यामुळे एफसी गोवास दोन गोलवर समाधान मानावे लागले. त्यांच्या स्पर्धेतील तिसरा सामना शनिवारी (ता. 12) एफसी वायएफए संघाविरुद्ध होईल.
सुश्मिताने पहिला गोल 25व्या मिनिटास केला, नंतर 78व्या मिनिटास तिने आणखी एक गोल नोंदविला. एफसी गोवाच्या आघाडीफळीत अर्पिता पेडणेकर व सुश्मिताने चांगला खेळ केला. सामन्याच्या 22व्या मिनिटास वालंका डिसोझाचा सणसणीत फ्रीकिक फटका कॉम्पॅशन एफसीच्या गोलरक्षकाने अडविल्यानंतर सुश्मिताने जोरदार फटक्यावर संघाचे गोलखाते उघडले. उत्तरार्धातील खेळात व्हेलानी फर्नांडिसचा फटका गोलपट्टीस आपटल्यामुळे एफसी गोवास आघाडी वाढविता आली नाही. सामना संपण्यास बारा मिनिटे बाकी असताना बदली खेळाडू पुष्पा परब हिच्या असिस्टवर सुश्मिताने एफसी गोवाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.