FC Goa: एफसी गोवाच्या आठव्या इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेतील कामगिरीत सातत्य नसल्याचे मागील काही सामन्यांत सिद्ध झाले आहे, सामन्यात वर्चस्व राखूनही त्यांना गोल (Goal) नोंदविण्यात अपयश येत आहे. या बाबतीत आपला संघ कमजोर असल्याची कबुली मुख्य प्रशिक्षक डेरिक परेरा यांनी दिली. (FC Goa Latest News Updates)
एफसी गोवाने (FC Goa) स्पर्धेत आतापर्यंत 13 सामन्यांत 17 गोल केले आहेत. बंगळूर एफसीविरुद्ध रविवारी रात्री आघाडी घेऊनही एफसी गोवास बरोबरीवर समाधान मानावे लागले. ‘‘बहुतेक सामन्यांत आम्ही चांगले खेळलो. वर्चस्व राखताना संधी निर्माण केल्या, पण गोल नोंदविण्यात येणारे अपयश चिंताजनक आहे. या बाबतीत आम्ही संघर्ष करतोय,’’ असे डेरिक सामन्यानंतर म्हणाले.
एफसी गोवास स्पर्धेत लौकिकानुसार खेळ करता आलेला नाही. 13 सामन्यांतून 14 गुणांची कमाई करत ते नवव्या क्रमांकावर आहेत. 3 विजय, 5 बरोबरी, 5 पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. संघ अजूनही उपांत्य फेरीची आशा बाळगून आहे. याविषयी डेरिक यांनी सांगितले, की ‘‘माझी देवावर श्रद्धा आहे आणि देवाच्या कृपेने काहीही शक्य आहे. आम्ही भरपूर मेहनत घेत आहोत. खेळाडूही सर्वोत्तम कामगिरी करत आहेत.’’
एकंदरीत परिस्थितीचे अवलोकन करता, बंगळूरविरुद्धची बरोबरी एफसी गोवासाठी चांगला निकाल असल्याचेही डेरिक यांनी नमूद केले. ‘‘सुरवातीच्या पंधरा मिनिटांत त्यांनी आमच्यावर खूप दबाव टाकला. त्यानंतर आम्ही पुनरागमन केले आणि मला वाटतं, काही प्रमाणात आम्ही खेळावर नियंत्रण राखले. आम्ही यापेक्षा चांगली कामगिरी करू शकतो. तरीही, एकंदरीत 1-1 बरोबरी ही योग्य निकाल आहे,’’ असे डेरिक म्हणाले.
ब्रँडनचे पुनरागमन
एफसी गोवाचा अनुभवी मध्यरक्षक ब्रँडन फर्नांडिस अखेर बंगळूरविरुद्ध मोसमातील पहिला सामना खेळला. 83व्या मिनिटास तो देवेंद्र मुरगावकरच्या जागी मैदानात उतरला. दुखापतीमुळे हा 27 वर्षीय खेळाडू बहुतांश मोसमास मुकला. ब्रँडनच्या पुनरागमनाविषयी डेरिक यांनी सांगितले, की ‘‘तो शंभर टक्के तंदुरुस्त ठरल्यास आम्ही त्याला निश्चितच खेळवू. त्याला काही मिनिटे खेळता आली याबद्दल मी खूष आहे. तो कितपत सज्ज आहे हे आम्हाला पाहायचे होते आणि मला वाटतं, त्याने चांगली कामगिरी बजावली. संघासमेवत आणखी दोन ते तीन सत्रानंतर निश्चितच त्याला स्टार्ट मिळू शकेल.’’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.