पणजी : सामन्यातील भरपाई वेळेतील काही सेकंद बाकी असताना बदली खेळाडू अलेक्झांडर रोमारियो जेसूराज याच्या हेडिंगमुळे एफसी गोवा संघ मंगळवारी पराभवापासून बचावला. आठव्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल सामन्यात त्यांनी ओडिशा एफसीला 1-1 असे गोलबरोबरीत रोखले. (FC Goa Escaped Defeat In The Indian Super League Football Tournament)
बांबोळी येथील स्टेडियमवर झालेल्या लढतीतील दोन्ही गोल बदली खेळाडूने नोंदविले. ब्राझीलियन जोनाथस ख्रिस्तियन याने पेनल्टी फटक्यावर नोंदविलेल्या गोलमुळे 61व्या मिनिटास ओडिशा एफसीला आघाडी मिळाली. नंतर 90+3 व्या मिनिटास आयराम काब्रेरा याच्या शानदार असिस्टवर रोमारियोच्या अचूक हेडिंगमुळे एफसी गोवास एक गुण मिळाला. 85व्या मिनिटास मैदानात उतरलेल्या रोमारियोचा हा मोसमातील दुसरा, तर एकंदरीत तिसरा आयएसएल गोल ठरला. ओडिशा एफसीची ही 14 लढतीतील तिसरी बरोबरी ठरली. त्यांचे आता 18 गुण झाले असून सातवा क्रमांक मिळाला आहे. एफसी गोवाने सहावी बरोबरी नोंदविली. त्यामुळे त्यांचे 15 लढतीतून 15 गुण झाले आहेत, मात्र नवव्या क्रमांकात बदल झालेला नाही.
ओडिशाचा पेनल्टी गोल
तासाभराच्या खेळानंतर आल्बेर्टो नोगेरा याने गोलक्षेत्रात ओडिशाच्या हावी हर्नांडेझ याला पाडण्याची चूक केली. ओडिशाचा फ्रीकिक फटका फोल ठरल्यानंतर हावी रिबाऊंडवर चेंडूचा ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात असताना नोगेराने त्याला टॅकल केले. रेफरीने पेनल्टी फटक्याची खूण केल्यानंतर उत्तरार्धाच्या सुरवातीस बदली खेळाडू या नात्याने मैदानात आलेल्या ब्राझीलियन जोनाथस ख्रिस्तियन याने अचूक नेम साधत गोलरक्षक नवीन कुमारचा नेम चुकविला. या 32 वर्षीय खेळाडूचा हा यावेळच्या आयएसएलमधील पाचवा गोल ठरला.
एफसी गोवाचे नेम चुकले
एफसी गोवाला (FC Goa) मोसमात सतावणारी सदोष नेमबाजीची डोकेदुखी पूर्वार्धात कायम राहिली. एफसी गोवाने चेंडूवर नियंत्रण व वर्चस्वही राखले, पण गोल नोंदविण्यात कमी पडले. ब्रँडन फर्नांडिस, आयराम काब्रेरा यांना ओडिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग याला चकविता आले नाही.
ओडिशाविरुद्ध एफसी गोवा अपराजित
- ओडिशाविरुद्ध 6 लढती आता एफसी गोवा अपराजित
- 4 लढतीत एफसी गोवा विजयी, 2 बरोबरी
- यंदा स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातही 1-1 गोलबरोबरी
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.